‘यूसीसी’ लागू करण्याची वेळ आली; उपराष्ट्रपती धनखड यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 06:26 IST2023-07-05T06:26:29+5:302023-07-05T06:26:38+5:30
धनखड म्हणाले की, संविधानाच्या रचनाकारांनी कल्पना केल्याप्रमाणे समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे.

‘यूसीसी’ लागू करण्याची वेळ आली; उपराष्ट्रपती धनखड यांचे वक्तव्य
नवी दिल्ली /गुवाहाटी : देशभरात समान नागरी कायद्यावरून दोन्ही बाजूंनी टीका होत असताना, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी समान नागरी कायद्याचे समर्थन करत समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.
‘ही तर राज्यघटनेच्या निर्मात्यांचीच कल्पना’
धनखड म्हणाले की, संविधानाच्या रचनाकारांनी कल्पना केल्याप्रमाणे समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, राज्य नागरिकांसाठी देशभरात यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न करेल. राज्यघटनेच्या निर्मात्यांची हीच विचारसरणी होती. कोणताही अडथळा किंवा आणखी विलंब होऊ शकत नाही. भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटीच्या २५ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.'
उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी कायदा
उत्तराखंड सरकार समान नागरी कायद्याबाबत विचार करत असून लवकरच हा कायदा राज्यात लागू केला जाईल, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले. मुख्यमंत्री धामी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अर्थात, समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर पंतप्रधानांसोबत कोणतीही चर्चा झाल्याचा त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, राज्य सरकारला आतापर्यंत समान नागरी संहितेवरील अहवालाचा पूर्ण मसुदा मिळालेला नाही.