उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:24 IST2025-08-01T13:08:38+5:302025-08-01T13:24:30+5:30
Vice Presidential Election: नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आय़ोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच जगदीप धनखड यांनी प्रकृतीचं कारण देत उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झालं आहे. दरम्यान, नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आय़ोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ७ ऑगस्ट रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होणार आहे. तर २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख २५ ऑगस्ट असेल.
९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून, सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही मतदानाची वेळ असेल. तसेच मतदान आटोपल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.
Election Commission of India announces schedule for the election of Vice President of India
— ANI (@ANI) August 1, 2025
Last date for nominations-August 21, 2025
Date of poll (if necessary)- September 9, 2025 pic.twitter.com/Ct6u3A9KpR
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभा या संसदेतील दोन्ही सभागृहातील सदस्य हे मतदार असतात. सद्यस्थितीत दोन्ही सभागृहांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे बहुमत आहे. त्यामुळे ही निवडणूक सत्ताधारी एनडीएसाठी फारशी अवघड जाण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत आता सत्ताधारी भाजपाकडून उपराष्ट्रपतीपदासाठी कुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.