Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:27 IST2025-06-15T12:25:56+5:302025-06-15T12:27:24+5:30

अहमदाबाद येथे झालेल्या दुर्घटनेमुळे शेकडो कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

The reputation of airlines has also been seriously affected after the Ahmedabad accident. | Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

कॅप्टन नीलेश गायकवाड 
माजी वैमानिक

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१ या बोइंग ७८७ ड्रीमलाइनरच्या विमानाच्या अपघाताकडे आधुनिक नागरी विमानसेवेतील भारतातील सर्वात गंभीर दुर्घटना म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे. बोइंग ७८७ ड्रीमलाइनर हे आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज विमान असूनही ही दुर्घटना घडल्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आज घडीला हवाई सुरक्षेतील तंत्रज्ञान कमालीचे प्रगत झाले आहे. ‘ब्लॅक बॉस’, ‘एव्हियोनिस’, ‘ऑटोमेटेड फ्लाइट सिस्टम्स’, ‘वेदर रेडार’, ‘टीसीएएस’ (ट्रॅफिक कोलिजन अवॉइडन्स सिस्टम) यांसारख्या तंत्रांमुळे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी झाली.  पण तरीही छोटीशी चूक किंवा हलगर्जीपणा किती महाभीषण ठरू शकतो, हे अहमदाबादच्या दुर्घटनेने दाखवून दिले आहे. हवाई अपघात केवळ तांत्रिक वा व्यवस्थापकीय त्रुटींचा परिणाम नसतो, तर तो मानवी समाजावर खोल परिणाम करणारा धक्का असतो. शेकडो कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. राष्ट्राच्या मानसिकतेवर, सरकारी विश्वासार्हतेवर आणि विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम होता.

विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदांतच  मेडे म्हणजेच आपत्ती कॉल दिला गेला. मात्र, त्यानंतर कोणतीही अधिकृत माहिती किंवा सिग्नल मिळाला नाही.  विमान उंची गाठण्यात अडचण येत होती असे बचावलेल्या एका प्रवाशाने सांगितले आहे. कोणत्याही विमानाला उड्डाण करण्यासाठी वैमानिकाला लिफ्ट जनरेट करावी लागते. म्हणजेच सुरुवातीला खूप वेगानं विमान वर न्यावं लागतं. प्रत्येक विमानाच्या प्रकारानुसार, आकारानुसार हा वेग ठरत असतो. या विशिष्ट वेगापर्यंत पोहोचल्यानंतर पुढील उड्डाणासाठी निर्धारित वेग मिळाला तर विमान वरच्या दिशेला झेपावते. आताच्या दुर्घटनाग्रस्त ड्रीमलायनरमध्ये लिफ्ट न मिळाल्यामुळे ते पडले की निर्धारित वेग मिळाला नाही, त्यादरम्यान वैमानिकाचं टॉवरसोबत काय बोलणं झालं या सर्व बाबींवर ब्लॅकबॉक्समधील डेटाचे अवलोकन केल्यानंतर प्रकाश पडेल. पण प्रामुख्याने वेग कमी होणे किंवा इंजिनमधील क्षमता कमी पडणे या गोष्टी कारणीभूत असू शकतात. लिफ्ट ही एअरोडायनॅमिक शक्ती असते. विमानाच्या पंखांवरून हवा वेगाने वाहिल्याने ती निर्माण होते आणि तीच विमानाला हवेत उचलून नेते. ही नैसर्गिक लिफ्ट बर्नोलीचे तत्त्व आणि न्यूटनचे गती नियम यावर आधारित असते.  

मुद्द्याची गोष्ट : 
अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण विमान अपघाताची नोंद इतिहासात होईल. कारण अत्यंत उच्च तंत्रज्ञान असलेल्या अत्याधुनिक अशा विमानाचा हा असा पहिलाच अपघात होता. बोइंगच्या विमानांकडे यामुळे संशयाने बघितले जात आहे. आता अपघाताच्या कारणाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. नेमका अपघात का झाला? हा ‘ड्रीम’ प्रश्न कायम आहे.

वैमानिक शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते... पण अनर्थ घडलाच
काही विशिष्ट अवस्थांमध्ये विशेषतः विमानाच्या उड्डाण व लँडिंगच्या वेळी लिफ्ट वाढविण्याची गरज भासते. अशावेळी विमानांमध्ये काही विशेष प्रणाली वापरली जाते. त्यांना आर्टिफिशियल लिफ्ट सिस्टम म्हणतात. यामध्ये मुख्यत्वेकरून हाय-लिफ्ट डिव्हाइसेस म्हणजे उड्डाणाच्या वेळी अतिरिक्त लिफ्ट निर्माण करणारी यंत्रणा महत्त्वाची असते. यामध्ये फ्लॅप्स आणि स्लॅट्स असतात. फ्लॅप्स पंखांच्या मागील बाजूस असतात.

उड्डाण किंवा लँडिंगवेळी हे फ्लॅप्स खाली व पुढे सरकवले जातात, ज्यामुळे पंखांचा पृष्ठभाग आणि वक्रता वाढून अधिक लिफ्ट निर्माण होते. दुसरीकडे, स्लॅट्स हे पंखांच्या पुढील टोकाला असतात. ते उघडल्यावर पंखाभोवती हवा अधिक सुरळीत वाहू लागते व स्टॉल (विमान हवेत स्थिर होणे) टाळता येतो. बोइंग ७८७ ड्रीमलाइनरसारख्या जेटलाइनर विमानांमध्ये क्रूगर फ्लॅप्स हे विशेष प्रकारचे स्लॅट्सदेखील वापरले जातात. 

ते पंखांच्या पुढील भागातून बाहेर येतात आणि टेकऑफच्या वेळी लिफ्ट वाढवतात. असे असूनही हे विमान कोसळले, याचा अर्थ हायड्रोलिक फ्लॅपमध्ये काही तरी बिघाडच किंवा समस्या निर्माण झालेली असण्याची शक्यता आहे. सदर विमान खाली कोसळताना त्याचे नोज म्हणजेच पुढील भाग वर होता आणि टेल म्हणजेच मागील भाग खाली होता. यावरून वैमानिक शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते हे लक्षात येते.  

...तर पायलटला वेळच मिळत नाही
बोइंग ७८७ मध्ये दोन स्वतंत्र इंजिन्स असतात. एक इंजिन बंद पडले तरी दुसरे इंजिन विमान उडवू शकते. मात्र, जर दोन्ही इंजिनचे कार्य एकाचवेळी बंद पडले, तर परिस्थिती गंभीर बनते. अहमदाबाद दुर्घटनेत असे घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. टेकऑफनंतर काही सेकंदांतच जर इंजिनमध्ये ‘पॉवर लॉस’ झाला असेल, तर पायलटला प्रतिसाद देण्याचा वेळच मिळत नाही. कधी कधी इंधन वितरण प्रणालीतील बिघाडामुळे इंजिनला योग्य प्रमाणात इंधन न मिळाल्याने इंजिन बंद पडते. बोइंग ७८७ मध्ये अत्यंत सुस्पष्ट फ्यूएल मीटरिंग प्रणाली असते.

पण जर ती ब्लॉक झाली,  तर इंजिन शटडाऊन होऊ शकते. तापमानामुळे इंजिन बंद पडले असू शकते का? काही जणांनी अहमदाबादमध्ये अपघाताच्या दिवशी तापमान ४० डिग्री सेल्सियस होते, याचा संबंध दुर्घटनेशी जोडला आहे; परंतु  ड्रीमलाइनरचे इंजिन स्वतः २००० अंश तापमान झेलण्यास सक्षम असते, त्यामुळे फक्त तापमानामुळे इंजिन बंद पडले असण्याची शक्यता दिसत नाही. उड्डाणानंतर काही वेळात लँडिंग गिअर फोल्ड केले जातात. मात्र या अपघातावेळी ते उघडे होते.  

या अपघातामागे नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत आहे हे पुढील काही दिवसांमध्ये ब्लॅकबॉक्स डेटा आणि फ्लाइट रेकॉर्डरच्या विश्लेषणातून समोर येईल. तूर्त, हा विमान अपघात भावनिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातूनही भारतासाठी आणि आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण उद्योगासाठी एक मोठा धक्का आहे.

Web Title: The reputation of airlines has also been seriously affected after the Ahmedabad accident.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.