राजीनाम्यानंतर जगदीप धनखड यांचे निरोपाचे भाषण का झालं नाही? समोर आलं हे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 21:03 IST2025-07-22T21:02:14+5:302025-07-22T21:03:50+5:30
उपराष्टपती पद सोडल्यानंतर जगदीप धनखड यांचा निरोप समारंभ न झाल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

राजीनाम्यानंतर जगदीप धनखड यांचे निरोपाचे भाषण का झालं नाही? समोर आलं हे कारण
Jagdeep Dhankhar Farewell: भारताचे १४ वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलैच्या रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला. जगदीप धनखड यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२७ पर्यंत होता, मात्र त्यांनी दोन वर्षे आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं. मात्र राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जगदीप धनखड राज्यसभेत आले नाहीत. तसेच सभागृहाकडूनही त्यांना अधिकृत निरोप देण्यात आला नाही. यामुळे विरोधकांनी सवाल उपस्थित केले. त्यामुळे आता येणाऱ्या काळात त्यांना सरकारकडून निरोप दिला जाईल का? असा प्रश्न विचारला जात आहे.
सोमवारी रात्री उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या एका पत्रात आरोग्यासंबंधी कारणे आणि उपचार घेण्याच्या सल्ल्याची माहिती देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देत आहे, असं जगदीप धनखड म्हणाले. जगदीप धनखड यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
जगदीप धनखड यांनी ११ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी ते २०१९ पासून पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. उपराष्ट्रपती असताना त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून भूमिका बजावली. या भूमिकेत त्यांनी सभागृहाचे कामकाज चालवले आणि अनेकदा कायदेविषयक प्रक्रियांवर त्यांचे स्पष्ट मत व्यक्त केले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात त्यांनी राजीनामा दिला.
जगदीप धनखड यांचा निरोप समारंभ न झाल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. मात्र इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, जर कोणी मध्यावधीत म्हणजेच कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिला तर निरोप भाषणाची तरतूद नाही. जेव्हा कोणी त्याचा कार्यकाळ पूर्ण करतो तेव्हाच निरोप दिला जातो. ऑगस्ट २०२२ मध्ये पदभार स्वीकारणारे ७४ वर्षीय धनखड यांचा कार्यकाळ २०२७ मध्ये पूर्ण होणार होता.
दरम्यान, संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार उपराष्ट्रपतींना त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी स्वतःच्या इच्छेनुसार राजीनामा देण्याचा अधिकार आहे. या अंतर्गत, उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींना लेखी स्वरूपात पाठवतात. त्यामुळे उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर, नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू केली जाणार आहे. दरम्यान, राज्यसभेचे कामकाज उपसभापती म्हणजेच हरिवंश नारायण सिंह यांच्याकडून चालवले जाणार आहे.