अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचं बांधकाम कुठवर आलं?; ट्रस्टनं शेअर केलेले २ फोटो पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 21:04 IST2022-03-31T21:03:31+5:302022-03-31T21:04:22+5:30
एवढेच नाही तर रामजन्मभूमी संकुलात यज्ञशाळा आणि सत्संग स्थळही असणार आहे. भक्तांना प्रसाद वाटपासाठी तेथे एक अन्नदान इमारतही बांधली जाईल

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचं बांधकाम कुठवर आलं?; ट्रस्टनं शेअर केलेले २ फोटो पाहा
अयोध्या – अयोध्येतील श्री राम जन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टात निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं होते. त्यानंतर बहुप्रतिक्षित राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात झाली. अयोध्येतील राम मंदिरासाठी देशभरातून अनेकांनी देणग्या दिल्या. मध्यंतरीच्या काळात ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्यामुळे प्रभू राम मंदिराचं बांधकाम कुठपर्यंत आले? हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाची आहे.
अयोध्येत प्रभू श्री रामाचं मंदिर कशारितीने बनणार? राम जन्मभूमी परिसरातील ७० एकर जागेत काय-काय बांधकाम होणार? याबाबत माहिती समोर आली आहे. सर्वात आधी प्रभू श्री राम मंदिरांच्या बांधकामाचे काही फोटो पाहून घ्या जे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जारी केले आहेत. श्रीराम जन्मभूमी बांधकाम परिसरात दगडांचे ब्लॉक टाकून पायाचं निर्माण केले जात आहे. त्याआधी गाभाऱ्यात ज्याठिकाणी श्री राम विराजमान होते तेथील चबुतऱ्याचं बांधकाम हाती घेतले आहे. गाभाऱ्यातील चबुतऱ्यासोबत फरशीचं काम हाती घेतले आहे. उर्वरित मंदिर बांधकामाच्या जागेच्या मोठ्या भागावर फरशी बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे.
अशाप्रकारे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट डिसेंबर २०२३ मध्ये राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्याच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करत आहे. यासाठी केवळ अयोध्याच नाही तर बन्सी पहारपूर येथे उभारण्यात आलेल्या वर्कशॉपमधून कोरलेले दगड रामजन्मभूमीच्या ठिकाणी नेले जात आहेत. श्री राम जन्मभूमी संकुलाच्या ७० एकर जागेत रामजन्मभूमी मंदिराशिवाय आणखी बरेच काही असेल. एक नक्षत्र उद्यान असेल, ज्यामध्ये नक्षत्रानुसार वृक्षारोपण देखील केले जाईल. तेथे एक संग्रहालय असेल, ज्यामध्ये उत्खननादरम्यान सापडलेले अवशेष ठेवले जातील. एक ग्रंथालय असेल जेथे श्री राम मंदिर आणि त्यासाठी संघर्ष करण्याव्यतिरिक्त सनातन धर्माशी संबंधित पुस्तके आणि साहित्य उपलब्ध असेल. रामजन्मभूमीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ते दाखवले जाणार आहे.
श्री रामजन्मभूमि मन्दिर स्थल पर फर्श निर्माण से पूर्व चबूतरा (प्लिंथ) के निर्माण का कार्य अब पूर्णता की ओर है।
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) March 31, 2022
The plinth work at Shri Ram Janmabhoomi Mandir site is reaching it's final stage. pic.twitter.com/1skLgzMuma
एवढेच नाही तर रामजन्मभूमी संकुलात यज्ञशाळा आणि सत्संग स्थळही असणार आहे. भक्तांना प्रसाद वाटपासाठी तेथे एक अन्नदान इमारतही बांधली जाईल, तर कॉरिडॉरमध्ये श्री रामाच्या जीवन चरित्रावर आधारित मूर्ती असतील. राम मंदिरासोबतच श्री रामाचे भक्त हनुमान आणि भगवान शंकराचे मंदिरही बांधले जाणार आहे. श्री राम मंदिराच्या दर्शनासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दर्शनासाठी येणार आहेत, हे लक्षात घेऊन श्री राम मंदिराची सुरक्षा ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येत आहे.
कोणतीही चूक होऊ नये यासाठी बीएसएफचे निवृत्त डीजी केके शर्मा यांचा राम मंदिर निर्माण समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सीआरपीएफ, आयएसएफ आणि स्थानिक पोलिसांची एक संयुक्त तुकडी तयार केली जाईल, ज्यामध्ये गुप्तचर पोलिसांच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. सूत्रांनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये, जेव्हा श्री रामजन्मभूमी मंदिर पर्यटकांसाठी खुले केले जाईल, तेव्हापासून हे विशेष युनिट सुरक्षेची जबाबदारी स्वीकारेल.