संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवरून पहिल्या दिवसापासून वातावरण तापलेले आहे. ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेतील चर्चेदरम्यान, विरोधकांकडून करण्यात आलेल्या मागणीवर संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू भडकले. विरोधकांचा गोंधळावर संताप व्यक्त करत किरण रिजिजू म्हणाले, 'चर्चेदरम्यान विरोधकांच्या बाजूने कोण बोलणार, हे सरकार ठरवू शकत नाही आणि सरकारच्या बाजूने कोण बोलणार हे विरोधक ठरवू शकत नाही.'
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विरोधकांच्या गोंधळावर रिजिजू म्हणाले, 'सर्व मुद्दे ऐकले आहेत आणि त्यावर विचार केला जाईल. पण, सगळ्याच मुद्द्यांवर चर्चा होऊ शकत नाही. आधी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होईल आणि पुढील मुद्द्यांबद्दल नंतर ठरवले जाईल. पंतप्रधानांनी कधी बोललं पाहिजे हे विरोधक ठरवू शकत नाही. बीएसी ठरवू शकत नाही", अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.
ऑपरेशन सिंदूरवर सोमवारपासून चर्चा
"माझे विरोधी पक्षांना आवाहन आहे की, संसदेत अडथळा निर्माण करू नये. नियमानुसार कोणताही मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात. आजच बैठकीत निर्णय झाला की, ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा सोमवारी होईल. सोमवारपासून संसदेचे कामकाज व्यवस्थित चालावं, याबद्दल सर्व पक्षांनी सहमती दर्शवली आहे. इतर मुद्द्यांवरही आम्ही नियमानुसार चर्चा करण्यास तयार आहोत", असेही रिजिजू म्हणाले.
न्याय व्यवस्थेत भ्रष्टाचार असेल तर... न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणावरही रिजिजू बोलले. ते म्हणाले की, "न्यायमूर्ती यशंवत वर्मा प्रकरणावर आम्ही स्पष्टपणे म्हटलेले आहे की, न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचारअसेल, तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल. प्रस्ताव आणावा लागेल. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. हा प्रस्ताव कोणत्या सभागृहात आणायचा, हा प्रश्न नाहीये. लोकसभेत मांडला गेला, तर राज्यसभेतही त्याला मंजुरी मिळेल."
यशवंत वर्मा प्रकरणावर मी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील नेते मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली आहे. या मुद्द्यावर दोघांशीही बोललो आहे, फक्त मी इथे त्याबद्दलची माहिती देऊ शकत नाही.