देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट, कोट्यवधीमध्ये झाली विक्री, एवढ्या किमतीत आली असती एक आलिशान कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 09:55 IST2025-11-27T09:55:05+5:302025-11-27T09:55:27+5:30
Most Expensive Number Plate: .हरियाणामधील सोनिपत येथे चार चाकी वाहनांच्या व्हीआयपी रजिस्ट्रेशन नंबर्सच्या ऑनलाइन लिलावावेळी मोठा इतिहास रचला गेला आहे. सोनिपत जिल्ह्यातील कुंडली भागातील फॅन्सी क्रमांक HR88B8888 ने यावेळी सर्व विक्रम मोडीत काढत बोलीमध्ये १ कोटी १७ लाख रुपये एवढी घसघशीत रक्कम मिळवली आहे

देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट, कोट्यवधीमध्ये झाली विक्री, एवढ्या किमतीत आली असती एक आलिशान कार
.हरियाणामधील सोनिपत येथे चार चाकी वाहनांच्या व्हीआयपी रजिस्ट्रेशन नंबर्सच्या ऑनलाइन लिलावावेळी मोठा इतिहास रचला गेला आहे. सोनिपत जिल्ह्यातील कुंडली भागातील फॅन्सी क्रमांक HR88B8888 ने यावेळी सर्व विक्रम मोडीत काढत बोलीमध्ये १ कोटी १७ लाख रुपये एवढी घसघशीत रक्कम मिळवली आहे कुठल्याही व्हीआयपी क्रमांकाला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक किंमत असून, हा आतापर्यंतचा देशातील सर्वात महागडा व्हीआयपी नंबर बनू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी बोलीची प्रक्रिया समाप्त झाली होती. तोपर्यंत या खास क्रमांकाची किंमत १.१७ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली होती. लिलाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप हा क्रमांक खरेदी करण्यात आलेला नाही. बोली लावणाऱ्या व्यक्तीने पुढच्या ५ दिवसांत पूर्ण रक्कम जमा करणे आवश्यक आहे, तेव्हाच हा नंबर ब्लॉक केला जाईल.
हा फॅन्सी क्रमांक सोनीपतमधील कुंडली क्षेत्रातील आहे, तसेच त्याला ब्लॉक केल्यानंतरच वाहनाची नोंदणीही येथेच होणार आहे. या क्रमांकामध्ये चारवेळा 8 हा आकडा आलेला असल्याने तो खूप खास मानला जात आहे. तसेच व्हीआयपी क्रमांकाची आवड असणाऱ्यांकडून 8888 या क्रमांकाची खास मागणी असते. दरम्यान, जर बोली लावणाऱ्या व्यक्तीने रक्कम जमा केली नाही, तर हा क्रमांक पुन्हा एकदा लिलावासाठी उपलब्ध केला जाऊ शकतो. भारतामध्ये कुठल्याही व्हीआयपी क्रमांकासाठी आतापर्यंत एवढी मोठी बोली लागली नसल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे.