आपल्याकडील विविध नियम कायदे हे नेतेमंडळी, आमदार-खासदार, मंत्री यांना लागू होत नाहीत, असे आपल्याकडे खेदाने म्हटले जाते. मात्र उत्तर प्रदेशमधील विधानसभा परिसरामध्ये एक अजब घटना घडली आहे. लखनौमधील विधानसभा परिसरातील नो पार्किंग झोनमध्ये लावलेली उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांची कार वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या मदतीने उचलून नेली. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय निषाद यांची पांढरी फॉर्च्युनर कार लखनौमधील विधानसभेच्या नो पार्किंग झोनमध्ये उभी होती. वाहतूक पोलिसांनी गुरवारी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर ही कार क्रेनच्या मदतीने उचलून नेली. ही कार अशा ठिकाणी उभी होती ज्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे पोलिसांनी परिस्थितीचा विचार करून या कारवर तत्काळ कारवाई केली. हा सर्व प्रकार घडला तेव्हा संजय निषाद हे विधानसभेमध्ये उपस्थित होते.
संजय निषाद यांची कार चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच वाहतुकीची कोंडीही होत होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत क्रेन बोलावली आणि सदर कार नो पार्किंग झोनमधून हटवली. या दरम्यान, कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला. आता आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.