मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:00 IST2025-11-11T17:59:33+5:302025-11-11T18:00:42+5:30
जम्मू-काश्मीर पोलिसांनी आता पुलवामा येथून आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचे नाव डॉक्टर सज्जाद अहमद मल्ला असे आहे.

मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवार, १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या दहशतवादी हल्ल्यात १० निष्पाप लोकांचा बळी गेला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, जम्मू-काश्मीर पोलिसांनी आता पुलवामा येथून आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचे नाव डॉक्टर सज्जाद अहमद मल्ला असे आहे. मुख्य आरोपी डॉक्टर उमरचा जवळचा मित्र असल्याने, या नवविवाहित डॉक्टराची या स्फोटातील भूमिका काय आहे, याबद्दल आता गूढ वाढले आहे.
दिल्ली स्फोटाच्या तपासात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी पुलवामा येथून डॉ. सज्जाद अहमद मल्ला याला ताब्यात घेतले आहे. सज्जाद हा बांदजू, पुलवामा येथील रहिवासी असून, तो स्फोटाचा मुख्य आरोपी डॉक्टर उमर याचा जवळचा मित्र असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सज्जादचे अवघे चार दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. मागील काही दिवसांपासून तो आरोपी डॉ. उमरच्या सतत संपर्कात होता. यामुळे या स्फोटाच्या कटात त्याची नेमकी भूमिका काय होती आणि त्याला या घटनेची कोणती माहिती होती, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. डॉ. उमरशी त्याचे असलेले संबंध, तपास यंत्रणांसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे.
डॉक्टर सज्जाद अहमद मल्ला याने बत्रा मेडिकल कॉलेज, जम्मू येथून एमबीबीएसची पदवी घेतली आहे आणि तो अलीकडेच अल फलाह येथे सीनियर रेसिडेंट म्हणून काम करू लागला होता. वैद्यकीय क्षेत्रातील एक व्यावसायिक तरुण असल्याने, त्याला बॉम्बस्फोटाच्या कटात का सामील व्हावे लागले, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
सध्या तरी सज्जादचा लाल किल्ला स्फोटाच्या कटात थेट सहभाग होता की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, तो मुख्य आरोपीचा मित्र होता आणि सतत त्याच्या संपर्कात होता, यावरून त्याच्यावर संशयाची सुई वळली आहे. या प्रकरणातील ही सहावी मोठी कारवाई आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातून पाचव्या डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले होते. सखोल चौकशीनंतरच या संपूर्ण कटामागचे सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे.