सुरक्षा दलांचे स्थान मंदिरच; पंतप्रधान माेदींची भावना, लेपचा येथे सुरक्षा दलांसोबत दहावी दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 11:05 IST2023-11-13T11:05:43+5:302023-11-13T11:05:53+5:30
रविवारी मोदी लेपचा येथे पोहोचले. सैनिकांसोबतच्या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

सुरक्षा दलांचे स्थान मंदिरच; पंतप्रधान माेदींची भावना, लेपचा येथे सुरक्षा दलांसोबत दहावी दिवाळी
लेपचा (हिमाचल प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांच्या अतूट धैर्याचे कौतुक केले. ‘माझ्यासाठी भारतीय लष्कर जिथे आहे, जिथे सुरक्षा दल तैनात आहे ते मंदिरापेक्षा कमी नाही,’ असे ते म्हणाले.
रविवारी मोदी लेपचा येथे पोहोचले. सैनिकांसोबतच्या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. ज्यामध्ये ते त्यांना मिठाई खाऊ घालताना दिसतात. ‘हिमाचल प्रदेशातील लेपचामध्ये आमच्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करणे हा भावनिक आणि अभिमानाने भरलेला अनुभव होता,’ असे पंतप्रधानांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘आपल्या राष्ट्राचे रक्षक, आपल्या कुटुंबापासून दूर राहतात, आपल्या समर्पणाने आपले जीवन उजळ करतात. त्यांच्या प्रियजनांपासून दूर, अतिदुर्गम भागात तैनात असताना त्यांचा त्याग आणि समर्पण आपल्याला सुरक्षित ठेवते. या वीरांचा भारत सदैव ऋणी राहील.’ तत्पूर्वी मोदींनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
पुन्हा सत्ते आल्यानंतरही खंड नाही
२०१९ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दिवाळी साजरी केली. २०२० मध्ये दिवाळीच्या दिवशी ते लोंगेवाला सीमा चौकीवर होते आणि २०२१ मध्ये त्यांनी नौशेरा येथे सैनिकांसोबत सण साजरा केला.
२०१४ पासून जवानांसोबत प्रत्येक दिवाळी साजरी
२०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी लष्करी जवानांना भेट देत आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधानांनी सियाचीन हिमनदी येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१५ मध्ये, १९६५ च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त, त्यांनी पंजाबमधील तीन स्मारकांना भेट दिली जिथे भारतीय सशस्त्र दलांनी भयंकर लढाया लढल्या आणि ज्या देशाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. मोदी २०१७ मध्ये उत्तर काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये होते, तर २०१८ मध्ये त्यांनी हरसिलमध्ये दिवाळी साजरी केली.