Electricity: दिवसा स्वस्त, तर रात्री महाग होणार वीज, सरकार घेणार अजब निर्णय, असा आहे हेतू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 14:53 IST2023-06-23T14:52:01+5:302023-06-23T14:53:57+5:30
Electricity Bill: केंद्र सरकार दिवस आणि रात्रीच्या विजेच्या दरांमध्ये बदल करण्याबाबत नवा नियम बनवण्याबाबत विचार करत आहे.

Electricity: दिवसा स्वस्त, तर रात्री महाग होणार वीज, सरकार घेणार अजब निर्णय, असा आहे हेतू
केंद्र सरकार विजेच्या दरांमध्ये बदल करण्याबाबत नवा नियम बनवण्याबाबत विचार करत आहे. ऊर्जा मंत्रालयाने आज याबाबत माहिती देताना सांगितले की, येणाऱ्या काळात भारतामध्ये नव्या वीज नियमांनुसार दिवसादरम्यान, विजेच्या दरांमध्ये २० टक्के कपात आणि रात्रीच्या वेळी २० टक्के वाढ करण्यास परवानगी मिळणार आहे. मंत्रालयाने सांगितले की, नावीन्यपूर्ण उर्जेचा वापर वाढवणे हा या निर्णयामागचा हेतू आहे.
या व्यवस्थेमुळे जेव्हा विजेची मागणी जास्त असेल, तेव्हा ग्रिडवरील मागणी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. अनेक भारतीय कुटुंबांमध्ये काम आटोपल्यावर एसीचा वापर सुरू होतो, त्यावेळी विजेची मागणी या निर्णयामुळे कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
हा नियम एप्रिल २०२४ पासून वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांसाठी आणि आणखी एक वर्षानंतर कृषी क्षेत्र सोडून बहुतांश ग्राहकांसाठी लागू होणार आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंह यांनी सांगितले की, सौर ऊर्जा स्वस्त आहे. त्यामुळे दिवसाच्या वेळी टॅरिफ कमी असेल. त्यामुळे ग्राहकांना याचा लाभ मिळेल. तर रात्रीच्या वेळी औष्णिक, जलविद्युत आणि गॅसवर आधारित क्षमतेचा वापर होतो. त्याचा खर्च सौरऊर्जेच्या तुलनेत अधिक असतो. तो खर्ज वीजबिलात दिसून येईल.
या निर्णयामुळे भारताला २०३० पर्यंत गैर जीवाश्म इंधनापासून आपल्या ऊर्जा क्षमतेच्या ६५ टक्के आणि २०७० पर्यंत शून्य उत्सर्जन मिळवण्याच्या दृष्टीने मदत मिळण्याची अपेक्षा आहे.