भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हे सात जन्मांचं बंधन मानलं जातं. आजच्या काळात नातेसंबंधांमधील वीण सैल होत चालली असताना काही पती-पत्नी मात्र शेवटपर्यंत एकमेकांची साथ देतात. त्यांना एकमेकांचा विरहही सहन होत नाही. अशीच घटना मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील बीना येथे घडली आहे. येथील नाराणय रैकवार आणि त्यांची पत्नी शिवकुमारी रैकवार या दाम्पत्याच्याबाबतीत याचाच प्रत्यय आला आहे. या दोघांचंही एकमेकांवर एवढं प्रेम होतं की, पत्नीच्या मृत्यूनंतर तासाभरातच पतीनेही प्राण सोडले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बीना येथील भीमवॉर्डमधील रहिवासी असलेल्या शिवकुमारी रैकवार ह्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने डॉक्टरांनी हात वर केले होते. त्यानंतर त्यांना घरी नेण्यात येत होते. मात्र वाटेतच त्यांचं निधन झालं.
जेव्हा त्यांचे मुलगे त्यांचा मृतदेह घेऊन आले तेव्हा पत्नीचा मृतदेह पाहून नारायण रैकवार यांना धक्का बसला. शोक अनावर होऊन ते एका कोपऱ्यात जाऊन बसले. काही वेळाने ते तिथेच कोसळले. मुलांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांच्या शरीरातून प्राण निघून गेला होता.
नारायण रैकवार आणि शिवकुमारी हे गेल्या ४८ वर्षांपासून एकमेकांना साथ देत संसार करत होते. त्यामुळे पत्नीचं निर्जिव शरीर पाहताच पती नारायण यांनीही प्राण सोडले. एकाचवेळी आई आणि वडिलांचं छत्र हरपल्याने मुले आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर या पती पत्नीवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.