सामान बांधून तयार, पण दिव्यांग मुलींसाठी आवश्यक सुविधा उभारणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 10:39 IST2025-07-08T10:39:35+5:302025-07-08T10:39:35+5:30
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड लवकरच जाणार नवीन घरात

सामान बांधून तयार, पण दिव्यांग मुलींसाठी आवश्यक सुविधा उभारणी सुरू
नवी दिल्ली : आमच्या सर्व सामानाची आधीच बांधाबांध झाली असून त्यातील काही सामान नवीन घरात पोहोचले आहे. उरलेले सामान सरन्यायाधीशांच्या बंगल्याच्या स्टोअर रूममध्ये आहे असे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. त्यांच्या दोन दत्तक व दिव्यांग कन्या प्रियांका व माही यांना ‘नेमालाइन मायोपॅथी’ हा विकार झाला असून त्यांना व्हीलचेअरने ये-जा करता येईल अशा निवासस्थानाची आवश्यकता आहे. नव्या निवासस्थानात या सर्व सोयी झाल्यानंतर लवकरच म्हणजे काही आठवड्यांतच तिथे राहायला जाऊ असे चंद्रचूड यांनी सांगितले.
दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील ५ क्रमांकाचा बंगला हे सरन्यायाधीशांचे शासकीय निवासस्थान आहे. तिथे अनुमतीपेक्षा जास्त काळ वास्तव्य केल्याबाबत सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रचूड म्हणाले की, २०२१मध्ये आमच्या दोनपैकी एका कन्येला चंडीगडमधील रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवावे लागले होते. जानेवारी २०२२मध्येही ती आणखी आजारी झाली. आता ती ट्रॅकियोस्टॉमी ट्यूबवर आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला लिहिले पत्र
दोन्ही कन्यांसाठी श्वसन, न्यूरोलॉजिकल, वेदना नियंत्रण अशा विविध प्रकारच्या नियमित उपचारांची गरज असते. त्यापैकी एकीला गिळण्यासही अडचण येते. डॉक्टर रोज त्यांची तपासणी करून काळजी घेतात. सरन्यायाधीशांचे शासकीय निवासस्थान त्वरित रिकामे करावे असे पत्र सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने १ जुलै रोजी केंद्र सरकारला पाठविले. चंद्रचूड यांना या घरात ३१ मेपर्यंत राहण्याची परवानगी देण्यात आली होती. चंद्रचूड हे सरन्यायाधीशपदावरून ८ नोव्हेंबर २०२४ रोजी निवृत्त झाले.
‘संजीव खन्ना यांनीच दिली होती मुदतवाढ’
माजी सीजेआय चंद्रचूड यांनी सांगितले की, माझ्या दोन कन्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना धूळ, ॲलर्जी किंवा संसर्ग यापासून लांब ठेवणे आवश्यक आहे.
शासकीय निवासस्थानात राहण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय सरन्यायाधीशांवर अलवंबून असतो. माझ्या निवृत्तीनंतर तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना या शासकीय निवासस्थानात राहायला जायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी मला या निवासस्थानात थांबण्याची विनंती केली. अन्यथा मी तेव्हाच जुन्या घरी सामान हलविणार होतो.