Gautam Adani Latest News: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अदानी इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांनी स्वतःचा प्रवास सांगतानाच विद्यार्थ्यांना यशाचा गुरूमंत्र सांगितला. भविष्या मोठे व्हायचे असेल, तर कोणत्या गोष्टींसाठी तयारी ठेवावी लागेल, याबद्दलही अदानींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विद्यार्थ्यांना संबोधित करताना उद्योगपती गौतम अदानी म्हणाले, "आज जग वेगाने बदलत आहे. या वेगाने बदलत असलेल्या जगात तुमची भूमिका पूर्वीपेक्षा आता खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी सातत्याने स्वप्न बघा. स्वतःला छोट्या स्वप्नांपुरतं मर्यादित करून ठेवू नका."
जे दुसऱ्यांना अशक्य वाटतं, ते शोधा
पुढे बोलताना ते म्हणाले, "स्वतःच्या परिस्थितीला आव्हान द्या आणि ज्या गोष्टी इतरांना अशक्य वाटतात, त्याची उत्तरं शोधा. त्याचबरोबर निरंतर नवनव्या गोष्टी शिकत रहा. भविष्य आता अत्यंत प्रभावशाली लोकांचे नाहीये, तर ते अशा लोकांचे आहे जे शिकण्यासाठी तयार आहेत."
"काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. तुमचं यश तेव्हा खूप आनंदायी आणि समाधानी असतं, जेव्हा ते दुसऱ्यांचंही आयुष्य सुधारतं मला असं वाटतं की, हीच सगळ्यात मोठी गुरू दक्षिणा आहे", असे गौतम अदानी विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणाले.
मला आशा आहे की, तुम्ही या गोष्टी शिकाल -गौतम अदानी
"अपयश येईल. अडथळे तुमची परीक्षा घेतील. पण, लक्षात ठेवा की, अपयश हे यशापेक्षा वेगळं नाहीये. अपयश यशाचा सगळ्यात मोठा साथीदार आहे. मला आशा आहे की, तुम्ही जेव्हा तुम्ही निवडलेल्या वाटेवरून चालायला लागाल, तेव्हा या गोष्टी शिकाल. आमचा प्रवास केवळ व्यवसायाशी संबंधित नाहीये. आम्ही जो निर्णय घेतला, जो धोका पत्करला, तो एका विशिष्ट उद्देशाने प्रेरित होता", असे गौतम अदानी म्हणाले.