अमेरिकेहून पहिले इंजिन आले! तेजस पुन्हा १.१ मॅकचा स्पीड गाठणार; कंपनीने सांगितले विलंबाचे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:24 IST2025-03-26T13:23:54+5:302025-03-26T13:24:22+5:30
इंजिन आल्याने आता तेजस लढाऊ विमानाचा सांगाडा बनविण्याचे, तसेच इतर यंत्रणा जोडण्याचे काम वेगाने सुरु होणार आहे.

अमेरिकेहून पहिले इंजिन आले! तेजस पुन्हा १.१ मॅकचा स्पीड गाठणार; कंपनीने सांगितले विलंबाचे कारण...
अमेरिकेने इंजिन पुरवठा न केल्याने तेजस फायटर जेटच्या निर्मितीचे काम रखडले होते. यामुळे हवाई दलाला वेगाने आपली विमाने बदलण्यास अडथळा आला होता. यावर गेल्याच महिन्यात हवाई दल प्रमुखांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)वर आपला विश्वास नसल्याचे वक्तव्य केले होते. आता ही चिंता दूर होणार आहे. अमेरिकेहून तेजससाठीचे पहिले इंजिन आले आहे.
इंजिन आल्याने आता तेजस लढाऊ विमानाचा सांगाडा बनविण्याचे, तसेच इतर यंत्रणा जोडण्याचे काम वेगाने सुरु होणार आहे. इंजिन नसल्याने हलच्या अभियंत्यांना याचा अंदाज येत नव्हता. यामुळे सर्वच कामे खोळंबली होती. अमेरिकेची जीई एअरोस्पेस कंपनीने पहिले लढाऊ इंजिन पाठविल्याचे जाहीर केले आहे.
तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टला आम्ही F404-IN20 या ९९ इंजिनांच्या ऑर्डरपैकी पहिले इंजिन पाठविले आहे. भारतासोबत आमचे ४० वर्षांचे संबंध आहेत, त्यांच्या संरक्षण क्षेत्राची क्षमता वाढविण्यासाठी आणि पुढील पिढीच्या लढऊ विमानांना मजबूत ताकद देण्यासाठी आम्ही एक मैलाचा दगड पार केला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
पाकिस्तान एकीकडे चीनकडून अद्ययावत लढाऊ विमाने घेण्याच्या तयारीत आहे. चीन दुसऱ्या बाजुने भारताच्या सीमेवर शस्त्रास्त्रे वाढवत आहे. अशातच भारताकडे मात्र, तीच जुनी लढाऊ विमाने आणि शस्त्रे आहेत. हल हवाई दलाला तेजस लढाऊ विमानांची पुढची पिढी देणार आहे. परंतू, अमेरिकेने या लढाऊ विमानांच्या इंजिनाला विलंब केला आहे. तसेच हलमध्ये अंतर्गत समस्या आहेत. यामुळे या फेब्रुवारीत हवाई दलाला मिळणारी ११ लढाऊ विमाने मिळू शकलेली नव्हती. यामुळे हवाई दल प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली होती.
तेजसला २००४ पासून याच कंपनीची इंजिन आहेत. या इंजिनाच्या साह्याने तेसजने १.१ मॅकचा स्पीड गाठला होता. हे सिंगल इंजिन असलेले लढाऊ विमान आहे.
कंपनीने सांगितले का उशीर झाला...
जीई कंपनीने भारतासाठी २०१६ पर्यंत ६५ इंजिन बनविली होती. परंतू. भारताने पुढे ऑर्डर न दिल्याने त्याची प्रॉडक्शन लाईन बंद करण्यात आली होती. हलने पुन्हा २०२१ मध्ये ९९ इंजिनची ऑर्डर दिली. परंतू, लाईन गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याने ती पुन्हा सुरु करण्यात अडचणी होत्या. बंद असलेली मशीनरी पुन्हा सुरु करण्याच्या आव्हानांना पार केले गेले. यानंतर ग्लोबल सप्लाय चेनही बंद पडली होती. ती देखील सुरु करण्यात आली, असे कारण कंपनीने विलंबासाठी दिले आहे.