गाजलेले हनी-ट्रॅप; १९८७ ते २०२५ पर्यंतची १५ प्रकरणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 11:27 IST2025-07-27T11:26:54+5:302025-07-27T11:27:55+5:30
हनी-ट्रॅप म्हणजे एखाद्या व्यक्तीशी रोमॅंटिक किंवा लैंगिक संबंध निर्माण करून त्याला फसवणे, ब्लॅकमेल करणे किंवा त्याच्याकडून गोपनीय माहिती मिळवणे.

गाजलेले हनी-ट्रॅप; १९८७ ते २०२५ पर्यंतची १५ प्रकरणे
डॉ. खुशालचंद बाहेती, माजी सहाय्यक पोलिस आयुक्त
हनी-ट्रॅप म्हणजे एखाद्या व्यक्तीशी रोमॅंटिक किंवा लैंगिक संबंध निर्माण करून त्याला फसवणे, ब्लॅकमेल करणे किंवा त्याच्याकडून गोपनीय माहिती मिळवणे. ही पद्धत अनेकदा गुप्तचर वापरतात. गुन्हेगारी हेतूंसाठी याचा वापर होत आहे. भारतातील पहिले नोंद झालेले हनी-ट्रॅप प्रकरण १९५० च्या दशकातील आहे. त्यावेळी मॉस्कोमध्ये तैनात असलेल्या एका भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याला ‘केजीबी’शी संबंधित रशियन महिलेने फसवण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे काही आक्षेपार्ह छायाचित्रे होती. मात्र, त्या अधिकाऱ्याने हे प्रकरण आपल्या वरिष्ठ राजदूतांना सांगितले आणि त्याद्वारे माहिती लीक होण्यापासून बचाव झाला.
१. के. व्ही. उन्नीकृष्णन प्रकरण (१९८७) : ‘राॅ’ या गुप्तचर संस्थेचे (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग) अधिकारी के. व्ही. उन्नीकृष्णन यांना एका अमेरिकन हवाई सुंदरीने हनी-ट्रॅप केले, जी यूएस इंटेलिजन्ससाठी काम करत होती. त्यांनी एलटीटीई संदर्भातील संवेदनशील माहिती लीक केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती.
२. इस्लामाबाद येथील नेव्हल अटॅशे प्रकरण (१९९०चे दशक) : कराचीतील एका नर्सने ‘आयएसआय’साठी काम करत असताना, भारतीय नौदल अधिकाऱ्याला हनी-ट्रॅप केले. सुरुवातीला त्याने ती नर्स आपल्यासाठी काम करत असल्याचे सांगितले, मात्र नंतर तो ब्लॅकमेलिंगमुळे माहिती लीक करत होता, हे समोर आले.
३. माधुरी गुप्ता प्रकरण (२०१०) : भारतीय उच्चायुक्त कार्यालयात कार्यरत माधुरी गुप्ता हिला ‘आयएसआय’ने एका पुरुषाच्या माध्यमातून फसवून, गोपनीय लष्करी माहिती मिळवली. तिला २०१० मध्ये अटक झाली हाेती.
४. निशांत अग्रवाल प्रकरण (२०१८) : ब्राह्मोस एरोस्पेसमध्ये अभियंता असलेल्या निशांत अग्रवालला ‘सेजल’ नावाच्या पाकिस्तानच्या हेराने सोशल मीडियावरून हनी-ट्रॅप केले. त्याने ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रकल्पाची माहिती लीक केली.
५. मध्य प्रदेश हनी-ट्रॅप रॅकेट (२०१९) : इंदूर व भोपालमध्ये पाच महिला आणि एक पुरुष यांनी राजकारणी, अधिकारी व व्यावसायिक यांना ब्लॅकमेल केले. त्यांच्याकडून तीन कोटींपर्यंत खंडणी वसूल केली गेली. एसआयटीच्या चौकशीत भाजप आणि काँग्रेसच्या काही नेत्यांची नावे समोर आली होती.
६. शिवसेना आमदार सेक्स्टॉर्शन प्रकरण (२०२१) : कुर्ला येथील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना भरतपूर (राजस्थान) येथील दीन मोहम्मद मेव याने बनावट महिला म्हणून सोशल मीडियावर संपर्क साधून ब्लॅकमेल केले.
७. शांतिमय राणा प्रकरण (२०२२) : भारतीय लष्करातील जवान शांतिमय राणा याला ‘गुरनौर कौर’ व ‘निशा’ या महिलांनी सोशल मीडियावरून फसवून लष्करी माहिती मिळवली.
८. गुजरात आयपीएस अधिकारी प्रकरण (२०२२) : गुजरातमधील सहा आयपीएस अधिकाऱ्यांना एका महिलेद्वारे हनी-ट्रॅप करण्यात आले. त्यांच्याकडून कोटींची खंडणी वसूल
केली गेली. कोणीही अधिकृत तक्रार केली नाही, मात्र या प्रकरणामुळे गुजरात पोलिस दल हादरले होते.
९. मध्य प्रदेश सिंचन विभाग एसडीओ प्रकरण (२०२३) : मध्य प्रदेशच्या सिंचन विभागातील एसडीओ यांना दहा लाखांच्या खंडणीसाठी हनी-ट्रॅप करण्यात आले. अधिक रक्कम मागितल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
१०. प्रदीप कुरूळकर प्रकरण (२०२३) : डीआरडीओमधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरूळकर यांना ‘झारा दासगुप्ता’ नावाच्या पाकिस्तानी हेर महिलेने फसवले. त्यांनी ब्राह्मोस आणि अग्नी क्षेपणास्त्र प्रकल्पाची माहिती शेअर केली.
११. बाबूराम डे प्रकरण (२०२३) : डीआरडीओच्या ओडिशा येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमधील वरिष्ठ अधिकारी बाबूराम डे यांना ‘उत्तर प्रदेशातील महिला विज्ञान विद्यार्थिनी’ म्हणून सादर केलेल्या पाकिस्तानी हेरने फसवले.
१२. प्रवीण मिश्रा प्रकरण (२०२४) : हैदराबादमधील डीआरडीओ सहयोगी संस्थेतील प्रवीण मिश्रा यांनी ‘सोनल गर्ग’ या बनावट आयबीएम कर्मचाऱ्याला ड्रोन विकासाची माहिती दिली. त्यांना गुजरातमध्ये अटक झाली.
१३. सतेंद्र सिवाल प्रकरण (२०२४) : मॉस्कोमधील भारतीय दूतावासात वाहनचालक असलेले सतेंद्र सिवाल यांना आयएसआयशी संबंधित महिलेने हनी-ट्रॅप करून संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयाची गोपनीय माहिती मिळवली.
१४. मुनीरत्न नायडू प्रकरण (२०२४) : राजराजेश्वरीनगर, कर्नाटकचे भाजप आमदार मुनीरत्न नायडू यांच्यावर एका महिलेने हनी-ट्रॅप रॅकेट चालवण्याचा आरोप केला. तिने माजी मुख्यमंत्री आणि इतर राजकारणी यांच्या खासगी व्हिडीओंचा वापर करून ब्लॅकमेल केल्याचा दावा केला. याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले.
१५. कर्नाटक हनी-ट्रॅप घोटाळा (२०२५) : सहकारमंत्री के. एन. राजण्णा यांनी विधानसभेत सांगितले की, त्यांच्यासह ४८ राजकारणी, केंद्रीय नेते व न्यायाधीशांना हनी-ट्रॅप करण्यात आले. या प्रकरणाने मोठी राजकीय खळबळ उडवून दिली. भाजप नेते अण्णाप्पा स्वामी यांनीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचा आरोप केला.