१४ कोटी तरुणांना रोजगार देणार, अर्थव्यवस्था लवकरच ‘टॉप ३’ मध्ये येणार - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 09:57 IST2023-08-29T09:57:06+5:302023-08-29T09:57:17+5:30
५१,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, वाहन, औषधी, पर्यटन आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे आणि तरुणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.

१४ कोटी तरुणांना रोजगार देणार, अर्थव्यवस्था लवकरच ‘टॉप ३’ मध्ये येणार - नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था वेगवान विकासासाठी तयार आहे आणि यामुळे तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आपली अर्थव्यवस्था लवकरच आघाडीच्या तीन देशांत सहभागी होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
५१,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, वाहन, औषधी, पर्यटन आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे आणि तरुणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. एकट्या पर्यटन क्षेत्राने २०३० पर्यंत अर्थव्यवस्थेत २० लाख कोटी रुपयांचे योगदान देणे अपेक्षित आहे आणि १३-१४ कोटी नवीन रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. देशभरात ४५ ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
९ वर्षांत ९ लाख दिल्या नोकऱ्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या नऊ वर्षांत रोजगारांमध्ये वाढ झाली असून, या काळात देशातील तरुणांना नऊ लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, असा दावा केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी केला. ते म्हणाले की, यूपीएच्या २००४ ते २०१३ या काळात सहा लाख नोकऱ्या देण्यात आल्या, तर सध्याच्या सरकारच्या काळात नऊ लाख नोकऱ्या देण्यात आल्या असून, त्यात ६० ते ७० टक्क्यांची वाढ झाली आहे.
२ कोटी नोकऱ्यांचे काय?
पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल अस्वस्थ वाटत असल्याने ते रोजगार मेळावे घेत आहेत आणि आपली प्रतिमा वाचवू इच्छित आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर केली. प्रतिवर्षी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला.