‘बम बम भोले’ म्हणत केदारनाथचे दरवाजे बंद;भाऊबीजेच्या पर्वावर महादेव ओंकारेश्वरकडे मार्गस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 08:50 IST2023-11-16T08:49:14+5:302023-11-16T08:50:09+5:30
दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि एप्रिल-मे महिन्यात उघडण्यात येतात.

‘बम बम भोले’ म्हणत केदारनाथचे दरवाजे बंद;भाऊबीजेच्या पर्वावर महादेव ओंकारेश्वरकडे मार्गस्थ
रुद्रप्रयाग : हिवाळ्याला सुरुवात होताच चारधामपैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाऊबीजेच्या पावन पर्वावर बंद झाले. यावेळी पारंपरिक पूजा आणि भारतीय सैन्याच्या बँड पथकाकडून भक्तिमय वातावरणात सादरीकरण करण्यात आले. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि एप्रिल-मे महिन्यात उघडण्यात येतात.
कडाक्याच्या थंडीतही हजारो भाविकांची गर्दी
कडाक्याच्या थंडीतही अडीच हजाराहून अधिक भाविकांची उपस्थिती होती. ‘जय केदार’, ‘बम बम भोले’ तसेच ‘ओम नम: शिवाय’चा जयघोष करण्यात आला. मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर केदारनाथाची पंचमुखी डोली हजारो भाविक आणि सैन्याच्या बँडपथकासोबत रामपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. पुढील वर्षी दरवाजे उघडेपर्यंत ओंकारेश्वर मंदिरात केदारनाथाचे दर्शन घेता येईल.
१९.५० लाख भाविकांनी घेतले दर्शन
यंदा २५ एप्रिल २०२३ ला मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत १९.५० लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले.
चारधाम कधी होतात बंद ?
गंगोत्री - १४ नोव्हेंबर
केदारनाथ - १५ नोव्हेंबर
यमुनोत्री - १५ नोव्हेंबर
बद्रीनाथ - १८ नोव्हेंबर