नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील (CAA) आंदोलन व 2020 दिल्ली दंगलींशी संबंधित प्रकरणात आरोपी असलेल्या उमर खालिद, शरजील इमाम आणि इतरांनी दाखल केलेल्या जामिन अर्जांवर सुप्रीम कोर्टात गुरुवारी सुनावणी झाली. या दरम्यान दिल्ली पोलिसांनी जामिनाला जोरदार विरोध करत आरोपींवर कठोर टिप्पणी केली.
डॉक्टर-इंजिनियर पेशा सोडून देशविरोधी कामे...
सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या वतीने हजर झालेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) एस. व्ही. राजू म्हणाले की, आजकाल डॉक्टर, इंजिनियर आपल्या व्यवसायात काम न करता देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होत आहेत. यावेळी राजू यांनी अनेक शहरांमध्ये शरजील इमाम याने दिलेल्या भाषणांचे व्हिडिओ कोर्टासमोर सादर केले आणि म्हटले की, हे साधे आंदोलन नसून हिंसक आंदोलन घडवण्याचा प्रयत्न होता. सीएए विधेयक मंजूर होण्याच्या सुमारास संपूर्ण घटना नियोजित असल्याचेही म्हटले.
मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न
ते पुढे म्हणाले, आरोपींना मुस्लिमांचा पाठिंबा मिळवण्याची संधी दिसली. आरोपी दिल्लीला होणारा पुरवठा खंडित करू इच्छित होते. आरोपी चिकन नेकच्या (आसामला भारताशी जोडणारा 16 किलोमीटरचा भूभाग आहे) माध्यमातून भारताच्या ईशान्येकडील आसामचा आर्थिकदृष्ट्या गळा दाबू इच्छित होते. या आंदोलनाचा उद्देश लोकांना आवश्यक वस्तूंपासून वंचित ठेवणे हा होता. आरोपीने काश्मीरबद्दल बोलून मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला. तिहेरी तलाकबद्दल बोलून न्यायालयाची बदनामीदेखील केल्याचा आरोप राजू यांनी केला.
शरजील इमामच्या भाषणांचे व्हिडिओ कोर्टात
राजू यांनी 2019–2020 दरम्यान चाखंड, जामिया, अलीगड आणि आसनसोल या ठिकाणी इमामने दिलेल्या भाषणांचे व्हिडिओ दाखवले. या भाषणांचा तपशील चार्जशीटचा भाग असल्याची पुष्टीही त्यांनी न्यायालयाला केली.
आरोपींच्या विलंबामुळे सुनावणी अडकली
ASG राजू यांनी पुढे सांगितले की, ट्रायल कोर्टातील विलंबासाठी स्वतः आरोपीच जबाबदार आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला जुन्या आदेशांचा हवाला देत सांगितले की, आरोप निश्चितीच्या सुनावणीदरम्यान अनेक वेळा बचाव पक्षाचे वकील हजर झाले नाहीत अशा परिस्थितीत केवळ विलंबाचे कारण देऊन जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे दिल्ली पोलिसांचे मत आहे.
काय आहे प्रकरण?
उमर खालिद, शरजील इमाम, गुलफिशा फातिमा, मीरान हैदर आणि इतरांवर 2020 दिल्ली दंगलींचे ‘मास्टरमाइंड’ असल्याचे आरोप आहेत. या दंगलींमध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता, तर 700 हून अधिक जखमी झाले होते.
Web Summary : Delhi Police opposed bail for Umar Khalid and Sharjeel Imam in the 2020 Delhi riots case, alleging a planned conspiracy to incite violence and disrupt the country. They presented evidence of inflammatory speeches and attempts to destabilize the region.
Web Summary : दिल्ली पुलिस ने 2020 के दिल्ली दंगों के मामले में उमर खालिद और शरजील इमाम की जमानत का विरोध किया, हिंसा भड़काने और देश को बाधित करने की साजिश का आरोप लगाया। उन्होंने भड़काऊ भाषणों और क्षेत्र को अस्थिर करने के प्रयासों के सबूत पेश किए।