'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 09:37 IST2025-07-09T09:35:34+5:302025-07-09T09:37:51+5:30
Anil Chauhan on china pakistan relations: भारताचे सीडीएस प्रमुख अनिल चौहान यांनी पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांच्यातील वाढत चाललेल्या जवळीकतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी देशातील सामाजिक सलोखा टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचेही म्हटले आहे.

'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
Anil Chauhan News: भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात वाढत चालेल्या जवळीकतेवरून सावधगिरीचा इशारा दिला आहे. चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येणे, हे भारताच्या सुरक्षिततेसाठी आणि स्थिरतेसाठी धोकादायक आहे, असे चौहान म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सीडीएस प्रमुख जनरल अनिल चौहान मंगळवारी एका थिंक टँक कार्यक्रमात बोलत होते. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर आज बाहेरून आतूनही प्रचंड ताण आहे, असे ते म्हणाले.
अमेरिकेची भूमिका अडथळे निर्माण करणारी
"आज जागतिक परिस्थिती खूप अस्थिर आहे. संपूर्ण जग जुन्या पद्धतीने नवीन जागतिक संतुलन साधण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. या संक्रमणाच्या काळात अमेरिकेची भूमिका अनेक पातळ्यांवर अडथळे निर्माण करत आहे", असे सीडीएस प्रमुख अनिल चौहान म्हणाले.
"एक मजबूत आणि लवचिक अर्थव्यवस्था कोणत्याही देशासाठी राष्ट्रीय शक्तीचा पाया असते. आर्थिक आणि व्यावसायिक सुरक्षाही राष्ट्रीय सुरक्षेतील महत्त्वाचा घटक आहेत. स्थिर विकास आणि शाश्वत विकास मजबूत अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे", असे भाष्य सीडीएस प्रमुख चौहान यांनी केले.
सामाजिक आणि देशांतर्गत सुरक्षा महत्त्वाची
"आपला देश बहुभाषिक आहे. बहुधर्मिय आणि अनेक जाती असलेला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक एकात्मता टिकवून ठेवणे खूपच गरजेचे आहे. सामाजिक सुरक्षेला देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेत खूप महत्त्वाचं म्हणून बघितले गेले पाहिजे. भारत आतून कमकुवत होत गेला, तर परकीय धोके अधिक दुष्परिणाम करणारे असतील", असे मत चौहान यांनी मांडले.
चीन-पाकिस्तान-बांगलादेशपासून सावध राहण्याची गरज
सीडीएस प्रमुख चौहान यांनी चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वाढत चाललेल्या जवळीकतेच्या मुद्द्यावरही बोट ठेवले. तीन देश एकत्र येणे भारताच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहेत, असे ते म्हणाले.
"चीन, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्या कोणत्याही प्रकारे राजनैतिक सहकार्य करण्यावर एकमत झाले, तर त्याचा थेट परिणाम भारताच्या सुरक्षेवर होईल. या तिन्ही देशातील समान हित भारताच्या विरोधात एक राजनैतिक आव्हान असेल. विशेषतः तेव्हा जेव्हा बांगलादेशात राजकीय अस्थिरता आहे आणि माजी पंतप्रधान भारतात शरणार्थी म्हणून राहत आहेत", असा इशारा त्यांनी दिला.