लैंगिक हिंसेमुळे १ अब्ज व्यक्तींचे बालपण अन् तारुण्यही कोमेजलेलेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:47 IST2025-12-11T11:46:31+5:302025-12-11T11:47:55+5:30
यासोबतच, सुमारे ६० कोटी ८० लाख महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसेचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे मानसिक आरोग्य विकारांपासून ते दीर्घकालीन शारीरिक आजारांपर्यंत आरोग्यावर गंभीर परिणाम झाले आहेत.

लैंगिक हिंसेमुळे १ अब्ज व्यक्तींचे बालपण अन् तारुण्यही कोमेजलेलेच
नवी दिल्ली : जगभरातील हिंसाचाराच्या संदर्भात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर अहवाल 'द लॅन्सेट' या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. २०२३ सालासाठीच्या जागतिक अभ्यासानुसार १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या १ अब्जाहून अधिक व्यक्तींनी बालपणी लैंगिक हिंसा अनुभवल्याचे उघड झाले.
भयंकर! पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
यासोबतच, सुमारे ६० कोटी ८० लाख महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसेचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे मानसिक आरोग्य विकारांपासून ते दीर्घकालीन शारीरिक आजारांपर्यंत आरोग्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. भारतातील परिस्थितीही याच जागतिक ट्रेंड्सप्रमाणे गंभीर असून, ही वारंवारता अत्यंत चिंताजनक आहे.
सुमारे ३ लाख जणांचा मृत्यू
या हिंसाचारामुळे जगभरात २ लाख ९० हजार लोकांचा मृत्यू झाला. या मृत्यूंचे मुख्य कारण आत्महत्या, एचआयव्ही/एड्स आणि टाईप २ मधुमेह हे होते. पुरुषांमध्ये या हिंसेमुळे 'स्वत:ला इजा पोहोचवणे' आणि 'स्किझोफ्रेनिया' हे आजार आढळ, तर महिलांमध्ये 'चिंता'.
आरोग्यावर झालेले परिणाम
हा अभ्यास बालपणीच्या लैंगिक हिंसाचारामुळे आणि जोडीदाराकडून होणाऱ्या हिंसेमुळे आरोग्यावर होणाऱ्या नुकसानावर नवीन प्रकाश टाकतो.
जोडीदाराकडून या हिंसेशी संबंधित जगभरात १,४५,००० मृत्यू झाले, ज्यात बहुतेक खुनाच्या घटना, आत्महत्या आणि एचआयव्ही/एड्सचा समावेश आहे. २०२३ मध्ये सुमारे ३०,००० महिलांची त्यांच्या जोडीदाराने हत्या केल्याचे अहवालात म्हटले आहे.
बालपणी लैंगिक हिंसा अनुभवल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर एकूण १४ प्रकारचे वाईट परिणाम होतात. यामध्ये मानसिक आजार, मादक पदार्थांच्या सेवनाची सवय आणि काही दीर्घकाळ चालणारे शारीरिक आजार यांचा समावेश आहे.
संशोधकांचे आवाहन
संशोधकांचे स्पष्ट म्हणणे आहे की, बाल लैंगिक हिंसाचार आणि जोडीदाराकडून होणारी हिंसा याकडे आता मोठ्या आरोग्य संकटाच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. दोन्ही प्रकारच्या हिंसेचे सर्वाधिक प्रमाण उप-सहारा आफ्रिका आणि दक्षिण आशिया या प्रदेशांमध्ये आढळले आहे.
यावर योग्य उपाययोजना केल्यास लाखो लोकांचे जीव वाचवता येतील, मानसिक आरोग्य सुधारता येईल आणि आपले समाज अधिक सुरक्षित बनवता येतील.
ही समस्या मुळापासून संपवण्यासाठी कायदे अधिक मजबूत करणे, स्त्री-पुरुष समानता वाढवणे आणि मदत सेवांचा विस्तार करणे खूप गरजेचे आहे.