संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:49 IST2025-08-06T18:49:18+5:302025-08-06T18:49:45+5:30
Rashtriya Swayamsevak Sangh News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त २६ ऑगस्टपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे तीन दिवसीय व्याख्यानमालेमध्ये संबोधित करणार आहेत.

संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त २६ ऑगस्टपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे तीन दिवसीय व्याख्यानमालेमध्ये संबोधित करणार आहेत. तसेच यामध्ये अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रभारी सुनील आंबेकर यांनी सांगितले की, आम्ही समाजातील सर्व वर्ग, समुदाय आमि विचारसरणीच्या लोकांशी संपर्क साधला आहे. तसेच जगभरातील विविध देशांच्या दूतावासांनाही निमंत्रण पाठवण्यात येत आहे. मात्र पाकिस्तान, तुर्कीए आणि बांगलादेश यांना हे निमंत्रण पाठवण्यात येणार नाही.
संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात येण्याची शक्यता नाही आहे. जे नेते आमच्या संपर्कामध्ये असतात. तसेच ज्यांचे आमच्यासोबत संबंध आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधत आहोत. मात्र जे नेते आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करणार नाहीत, अशा लोकांना बोलावण्याला काही अर्थ नाही, असे संघातील सूत्रांनी स्पष्ट केले पाहिजे.
दरम्यान, या कार्यक्रमामध्ये देश, विदेशातील अनेक संस्थांशी आम्ही संपर्क साधला आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता आम्ही पाकिस्तान, तुर्कीए आणि बांगलादेश या देशांच्या दूतावासांना निमंत्रण देणार नाही, असे संघाने स्पष्ट केले आहे. बांगलादेशमधील सरकारने गेल्या काही काळापासून भारतविरोधी भूमिका घेतली आहे. तर तुर्कीएने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला मदत केली होती. दरम्यान, या कार्यक्रमासाठी संघाकडून नितमंत्रित करण्यात येणाऱ्या पाहुण्यांच्या यादीमध्ये अल्पसंख्याक समुदायांचे प्रतिनिधी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती, विचारवंत, उद्योजक आणि बुद्धिजीवींचा समावेश असेल.