मर्कटलीला! माकडांच्या उचापतींमुळे जंगलात २ तास अडकली मुंबईहून निघालेली अवध एक्स्प्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 16:44 IST2022-07-07T16:43:50+5:302022-07-07T16:44:36+5:30
Indian Railway: माकडांच्या टोळक्याने जंगलात रेल्वेगाडीचा खोळंबा केल्याची अजब घटना समोर आली आहे. माकडांमुळे वांद्रे (मुंबई) येथून बरौनी येथे जात असलेली अवध एक्स्प्रेस जंगलात अडकली.

मर्कटलीला! माकडांच्या उचापतींमुळे जंगलात २ तास अडकली मुंबईहून निघालेली अवध एक्स्प्रेस
पाटणा - आपल्या आसपास वावरणाऱ्या माकडांच्या टोळ्यांच्या मर्कटलीला तुम्ही पाहिल्या असतील. मात्र या माकडांच्या टोळक्याने जंगलात रेल्वेगाडीचा खोळंबा केल्याची अजब घटना समोर आली आहे. माकडांमुळे वांद्रे (मुंबई) येथून बरौनी येथे जात असलेली अवध एक्स्प्रेस जंगलात अडकली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार माकडांचे एक टोळक्याने रेल्वेच्या हायटेन्शन तारेवर उड्या मारायला सुरुवात केली. त्यामुळे तार तुटली. तार तुटल्याने रेल्वेचं दळणवळण ठप्प झालं. याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. खूप प्रयत्नानंतर ही वायर दुरुस्त झाली. त्यानंतर दोन तासांनी अवध एक्सप्रेस रवाना झाली. हायटेन्शन वायर तुटल्याने गोरखपूर-नरकटियागंज रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
मिळालेल्या माहितीनुसार गोरखपूर-नरकटियागंज रेल्वेमार्गावर वाल्मिकीनगर रेल्वेस्टेशनजवळ पोल क्रमांक ३१९/१ च्या जवळ हायटेन्शन वायरच्या संपर्कात माकड आल्याने तारमध्ये लागलेला इन्सुलेटर तुटून रेल्वेट्रॅकवर पडला. त्यामुळे ट्रेनची वाहतून पूर्णपणे ठप्प झाली. याची माहिती वाल्मिकीनगर पोलीस ठाणे,आणि पनियहवा स्टेशन मास्तर आणि समस्तीपूर कंट्रोल रूमला देण्यात आली.
हायटेन्शन वायर तुटल्याने बांद्रा येथून बरौनी येथे जाणाऱ्या अवध एक्स्प्रेस व्हीटीआरच्या जंगलात खोळंबून राहिली. या रेल्वेमार्गावर चालणाऱ्या सप्तक्रांती एक्स्प्रेससह अनेक ट्रेन विविध स्थानकांवर रोखावे लागले.