११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:24 IST2025-11-04T18:23:00+5:302025-11-04T18:24:20+5:30
लॉटरीच्या नियमानुसार, तिकीट खरेदी करताना अमितने त्याचा मोबाईल नंबर दिला होता, पण जयपूरला परतल्यावर त्याचा मोबाईल खराब झाला.

११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
पंजाब सरकारची ११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला आहे. जयपूरच्या रस्त्यावर टोमॅटो, कांदे अन् बटाटे विकणाऱ्या अमितचं नशीब रातोरात फळफळलं आहे. अमित हा राजस्थानमधील जयपूरमध्ये रस्त्यावर भाजीपाल्याच गाडी लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी तो आपली पत्नी आणि दोन मुलांसह चंदीगडमधील पंजाब स्टेट लॉटरी कार्यालयात ११ कोटींचा दावा करण्यासाठी पोहोचला.
कधीकाळी शिव्या ऐकल्या, पण आज नशीब बदलले
लॉटरी क्लेम करण्यासाठी आलेल्या अमितने आपले आयुष्य कसे होते, याबद्दल सांगितले. "मी गल्ली-बोळात हातगाडीवरून भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मला ११ कोटींची लॉटरी लागली आहे, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. अनेकदा भाजीची गाडी लावताना पोलीसवाल्यांकडून शिव्या ऐकाव्या लागल्या. पण आज माझ्यावर हनुमानाने कृपा केली, म्हणून मी देवाचा आभारी आहे."
अमित म्हणाला की, तो मागील २० वर्षांपासून सातत्याने लॉटरीची तिकिटे खरेदी करत होता, पण कधीही मोठा फायदा झाला नव्हता.
येण्यासाठीही नव्हते पैसे, आज नशीब पालटले!
अमितच्या संघर्षाची कहाणी अतिशय भावूक करणारी आहे. तो म्हणाला, "मी लॉटरी क्लेम करण्यासाठी जयपूरहून चंदीगडला आलो. पण, इथे येण्यासाठी माझ्याकडे बसचे भाडे देता येईल इतके पैसे देखील नव्हते. मी एका व्यक्तीकडून उसने पैसे घेऊन इथे पोहोचलो आहे. पण आता माझे नशीब पूर्णपणे बदलले आहे."
अमितने सांगितले की, त्याचा मुलगा नेहमी म्हणायचा, 'पप्पा, मी आयएएस अधिकारी बनेन'. आता अमित म्हणाला, "या पैशातून मी माझ्या मुलांना चांगले शिक्षण देईन आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करेन."
बठिंडामधून खरेदी केले होते तिकीट
पंजाब स्टेट डियर दिवाळी बंपर २०२५ या लॉटरीत एकूण ३६ कोटी १४ लाख ७८ हजार रुपयांची बक्षिसे वाटण्यात आली आहेत. या लॉटरीत जवळपास १८ लाख ८४ हजार तिकिटांची विक्री झाली होती. अमितने हे लॉटरीचे तिकीट (A ४३८५८६) पंजाबमधील बठिंडा येथून खरेदी केले होते.
मोबाईल खराब झाल्याने संपर्क तुटला
लॉटरीच्या नियमानुसार, तिकीट खरेदी करताना अमितने त्याचा मोबाईल नंबर दिला होता, पण जयपूरला परतल्यावर त्याचा मोबाईल खराब झाला. लॉटरी लागल्यावर अधिकाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा नंबर सतत बंद येत होता. अखेर प्रयत्नपूर्वक त्याला शोधण्यात आले.
लॉटरीचा निकाल लागल्यानंतर ३० दिवसांच्या आत चंदीगडमधील पंजाब स्टेट लॉटरी कार्यालयात तिकीट जमा करणे बंधनकारक आहे. यानंतरच विजेत्याला चेकद्वारे रक्कम दिली जाईल.