पाठ्यपुस्तकात पंतप्रधानांचा धडा नसणार
By Admin | Updated: May 31, 2014 06:14 IST2014-05-31T06:14:43+5:302014-05-31T06:14:43+5:30
हयातीतील व्यक्तीची जीवनगाथा शालेय अभ्यासक्रमातून शिकवण्याला विरोध केल्याने त्यांच्यावरील धडा अभ्यासक्रमात टाकण्याचा विचार भाजपाशासित गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारने सोडून दिला.

पाठ्यपुस्तकात पंतप्रधानांचा धडा नसणार
गांधीनगर/ भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हयातीतील व्यक्तीची जीवनगाथा शालेय अभ्यासक्रमातून शिकवण्याला विरोध केल्याने त्यांच्यावरील धडा अभ्यासक्रमात टाकण्याचा विचार भाजपाशासित गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारने सोडून दिला. या राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना ‘प्रेरणा’ मिळावी म्हणून मोदींवरील एक धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला; पण या कल्पनेस खुद्द पंतप्रधानांनी विरोध दर्शविला आहे. हयात असलेल्यांची जीवनकथा शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली जाऊ नये, असे ठाम मत आहे, असे मोदींनी शुक्रवारी सकाळी टिष्ट्वट केले. त्यानंतर त्यांनी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंग चुडासमा यांना फोन केला आणि या कल्पनेला विरोध दर्शवला. या घटनाक्रमानंतर चुडासमा यांनी मोदींचा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करणार नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे भोपाळ येथे मध्यप्रदेशचे शालेय शिक्षणमंत्री दीपक जोशी यांनी देखील मोदींची जीवनकथा अभ्यासक्रमात समाविष्ट करणार नसल्याचे सांगितले. राजस्थानचे शिक्षणमंत्री कालिचरण सराफ यांनीही मोदींचा धडा सामील करणार नसल्याचे सांगितले. राज्य सरकारच्या प्रस्तावांना विरोध करताना पंतप्रधान मोदी यांनी टिष्ट्वट केले की, मोदींच्या आयुष्यातील संघर्षावरील धडा शालेय अभ्यासक्रमामध्ये घेण्यास काही राज्य उत्सुक आहेत, असे वृत्त वाचले. हयात असलेल्या व्यक्तींची जीवनकथा शालेय अभ्यासक्रमात असू नये, यावर माझा ठाम विश्वास आहे. भारताच्या इतिहासामध्ये अनेक दिग्गज होऊन गेले आहेत. त्यांच्यामुळे देश घडला. लहान मुलांनी त्यांच्याविषयी वाचावे आणि अनुकरण करावे, असे त्यांनी नमूद केले. (वृत्तसंस्था)