"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 23:44 IST2025-05-01T23:40:54+5:302025-05-01T23:44:25+5:30
Pahalgam Terror Attack : पहलगाममधी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी एशान्या यांनी या घटनेवरून संतप्त शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे. केवळ एक दोन दहशतवाद्यांची घरं जाळून काही होणार नाही. या दहशतवाद्यांवर त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या झाडल्या पाहिजेत, अशी मागणी एशान्या यांनी केली.

"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी
गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून २६ जणांची हत्या केली होती. या प्रकारामुळे देशात संतापाचं वातावरण आहे. तसेच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी एशान्या यांनी या घटनेवरून संतप्त शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे. केवळ एक दोन दहशतवाद्यांची घरं जाळून काही होणार नाही. या दहशतवाद्यांवर त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या झाडल्या पाहिजेत, अशी मागणी एशान्या यांनी केली.
त्या म्हणाल्या की, केवळ एक दोन दहशतवाद्यांची घरं जाळून काय होणार, हे दहशतवादी कुठून येतात, कुठे जातात हा प्रश्न आहे. हे दहशतवादी पाकिस्तानी असावेत, असंही काही नाही. पहलगाम पाकिस्तानच्या सीमेपासून शेकडो किलोमीटर दूर आहे. हे दहशतवादी स्थानिक असले पाहिजेत. तसेच बैसरन येथए एवढे लोक असतानाही हे दहशतवादी कसे काय पळून गेले हाही प्रश्नच आहे, असेही त्या म्हणाल्या.
दहशतवाद्यांना शोधून, कुठलाही सवाल जबाब न करता त्वरित मारलं पाहिजे. हाच आमच्यासाठी बदला असेल. एक दोघांची घरं जाळून काही होणार नाही. या दहशतवाद्यांनी आमच्यासोबत जसं केलं. तसंच त्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालून ठार केलं पाहिजे. बेसरनमध्ये जेवढ्या महिलांनी त्यांच्या पतींना मरताना पाहिलंय, त्या सर्वजणी मनातून खचल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याबाबतही एशान्या यांनी मोठं विधान केलं. त्या म्हणाल्या की, जर दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं असेल तर हा स्पष्टपणे धर्माशी संबंधित विषय आहे. जर त्यांनी हिंदू आहात का असं विचारून मागलं असेल, तर हा हिंदूशी संबंधित विषय आहे. मला या सर्व वादात पडायचं नाही. मात्र हिंदू-मुस्लिमांनी एकत्र व्हावं, असं आम्ही कसं काय सांगू शकतो. दहशतवाद्यांनी मुस्लिमांना वेगळे केले. त्यामुळे ते सुखरूप घरी गेले. कदाचित आम्ही मुसलमान असतो तर आम्हीही वाचलो असतो.