India Pakistan LOC News: भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हाती घेत दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर दोन्ही देशातील लष्करी संघर्ष वाढल्यानंतर भारतीय लष्कराने सीमेशेजारील दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड्सही उद्ध्वस्त केले होते. पण, आता पुन्हा एकदा सीमेपलिकडे दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या असून, ते त्यांच्या पाकिस्तानातील अड्ड्यांवर परत येऊ लागले असल्याचे बीएसएफने सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सीमा सुरक्षा दलाने दावा केला की दहशतवादी पुन्हा त्यांच्या त्यांच्या अड्ड्यांवर परत येऊ लागले असल्याचे अनेक इनपूट्स आम्हाला मिळाले आहेत. त्यांच्या सीमेशेजारील लॉन्च पॅड्स आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अड्ड्यांवर येऊ लागले आहेत.
गुप्तचर यंत्रणांकडून सावधगिरीचा इशारा
बीएएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाचे पोलीस महानिरीक्षक शशांक आनंद यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
गुप्तचर यंत्रणांकडून जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण सीमेवर घुसखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी सावध राहण्यास सांगितले आहे. आम्ही गेल्या काही दिवसांपासून या हालचालींवर नजर ठेवून होतो, असेही आनंद यांनी सांगितले.
दहशतवादी कधी घुसखोरी करू शकतात, याबद्दल सध्या तरी आमच्याकडे निश्चित माहिती नाही. पण, दहशतवादी संघटना घुसखोरी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती सातत्याने प्राप्त होत आहे. ते त्यांच्या दहशतवादी अड्ड्यांवरही येऊ लागले आहेत. सध्या दहशतवादी प्रशिक्षण सुरू करत असून, त्यानंतर घुसखोरीचे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे आपल्या सीमेवरील सुरक्षा यंत्रणांना अलर्ट राहण्याची गरज आहे, अशी माहिती आनंद यांनी दिली.
भारताने ९ अड्डे केले उद्ध्वस्त
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने विशेष लष्करी मोहीम दहशतवाद्यांविरोधात हाती घेतली. ६ आणि ७ मे २०२५ रोजी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले.
भारतीय लष्कराने जोरदार हवाई हल्ले चढवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांनाही लक्ष्य केले होते.