दहशतवाद्यांच्या मॉड्युलचा पर्दाफाश, २९०० किलो स्फोटके, रसायने जप्त, गुजरातनंतर आणखी दोन डॉक्टरांना झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 07:03 IST2025-11-11T07:02:54+5:302025-11-11T07:03:31+5:30
Terrorist module busted: सुरक्षा यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार-गजवातुल-हिंद या संघटनांच्या एका आंतरराज्यीय, तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. जम्मू-काश्मीरसह विविध राज्यांतील सुरक्षा यंत्रणांनी राबवलेल्या या नव्या मोहिमेत दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत २९०० किलो स्फोटके सापडली आहे.

दहशतवाद्यांच्या मॉड्युलचा पर्दाफाश, २९०० किलो स्फोटके, रसायने जप्त, गुजरातनंतर आणखी दोन डॉक्टरांना झाली अटक
श्रीनगर/ फरिदाबाद - सुरक्षा यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार-गजवातुल-हिंद या संघटनांच्या एका आंतरराज्यीय, तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. जम्मू-काश्मीरसह विविध राज्यांतील सुरक्षा यंत्रणांनी राबवलेल्या या नव्या मोहिमेत दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत २९०० किलो स्फोटके सापडली आहे. गुजरातमधील रविवारची कारवाई व आता फरिदाबादेतील कारवाईनंतर आतापर्यंत तीन डॉक्टरसह ८ प्रमुख दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.
अटक केलेल्यांत काश्मीरच्या डॉ. मुजम्मिल गनी आणि लखनऊच्या डॉ. शाहीन याचा समावेश आहे. हरियाणातील अल-फला विद्यापीठात प्राध्यापक असलेला मुजम्मिल श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ सुरक्षा दलांविरुद्ध पोस्टर लावल्याच्या प्रकरणात हवा होता.
मोठी कारवाई कशी झाली?
गुजरात एटीएसने रविवारी डॉ. अहमद सय्यदसह तिघांना अटक केली. डॉ. गनी व डॉ. शाहीन यांना चौकशीसाठी श्रीनगर येथे आणण्यात आले आहे. त्यांच्याकडून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली.
गनी व आदिल होते हँडलर?
या दोघांच्या फोनमध्ये अनेक पाकिस्तानी नंबर सापडले होते. हे दोघे हँडलर असावेत, अशी शंका आहे. प्रारंभिक तपासात ते पाक म्होरक्यांच्या संपर्कात होते, असे स्पष्ट झाले आहे.
स्फोटके, शस्त्रे जप्त
९०० किलो स्फोटकांत अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट व सल्फरचा समावेश असून, ३६० किलो ज्वालाग्राही पदार्थ जप्त करण्यात आले. काही रसायने, इलेक्ट्रॉनिक सर्किट, बॅटऱ्या, तारा, रिमोट कंट्रोल, टायमर, विशिष्ट धातूचा पत्रा जप्त करण्यात आला आहे.
सात जण काश्मिरी
अटक केलेल्या आठपैकी सात जण काश्मिरी आहेत. यात आरिफ निजार डार ऊर्फ साहिल, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद डार ऊर्फ शाहिद, शोपियांचा मौलवी इरफान अहमद याच्यासह इतरांचा समावेश आहे.