Terrorist Arrested: गुजरात एटीएसने अल-कायदाशी संबंधित चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे चौघेही बऱ्याच काळापासून सक्रिय होते. एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दोघांना गुजरातमधून, एका दिल्लीतून आणि एका दहशतवाद्याला नोएडामधून अटक करण्यात असून, सध्या त्यांची कचून चौकशी केली जात आहे. एटीएसचे डीआयजी सुनील जोश यांनी याबाबत माहिती दिली.
मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत...गुजरात एटीएसने पकडलेल्या चार दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसच्या मते, चौघेही अल-कायदाचे मॉड्यूल AQIS (Al-Qaeda in Indian subcontinent) शी संबंधित होते. चौघांचे वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असून, भारतात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत होते. एटीएसचे डीआयजी सुनील जोशी म्हणाले की, सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून, लवकरच पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण कारवाईशी संबंधित तपशीलवार माहिती सार्वजनिक केली जाईल.
सोशल मीडियाद्वारे संपर्क साधायचेझीशान, फरदीन, सैफुल्ला आणि फारिक अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. एटीएसच्या मते, चौघेही सोशल मीडियाद्वारे अल-कायदालाचा प्रचार-प्रसार आणि या गटात लोकांना जोडण्याचे काम करायचे. ही अटक सुरक्षा यंत्रणांचे मोठे यश मानली जात आहे. गुजरात एटीएस आणि केंद्रीय संस्था आता त्यांच्या नेटवर्क, निधी, प्रशिक्षण आणि परदेशी संपर्कांचे दुवे जोडण्यात गुंतल्या आहेत. येत्या काळात या प्रकरणात आणखी खुलासे आणि अटक होऊ शकतात.
आयमान अल-जवाहिरीने केली होती संघटनेची स्थापना
२०२३ मध्ये अहमदाबादच्या वेगवेगळ्या भागातून या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. AQIS ही अल कायदाशी संबंधित एक दहशतवादी संघटना आहे. तिची स्थापना ३ सप्टेंबर २०१४ रोजी आयमान अल-जवाहिरी याने केली होती. AQIS भारतात आपले पाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, गुप्तचर संस्थांच्या सतर्कतेमुळे अद्याप ते आपल्या योजनांमध्ये यशस्वी होऊ शकले नाही.