तेलंगण ठरले देशातील २९ वे राज्य
By Admin | Updated: June 2, 2014 09:59 IST2014-06-02T09:59:08+5:302014-06-02T09:59:17+5:30
आंध्रपद्रेशच्या औपचारिक विभाजनानंतर सोमवारी सकाळी तेलंगण स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले असून चंद्रशेखर राव यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

तेलंगण ठरले देशातील २९ वे राज्य
ऑनलाइन टीम
हैदराबाद, दि. २ - आंध्रपद्रेशच्या औपचारिक विभाजनानंतर सोमवारी सकाळी तेलंगण स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. तेंलगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखऱ राव यांनी तेलंगणच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली व संपूर्ण तेलंगणमध्ये एकच जल्लोष करण्यात आला.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर युपीए सरकारने आंध्रप्रदेशचे विभाजन करुन स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखवला होता. १ मार्चपासून तेलंगण व आंध्रप्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. लोकसभा निवडणुकीसह या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेसाठी मतदान पार पडले होते. यात तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसने तेलंगणमधील ११९ पैकी ६३ जागांवर विजय मिळवला होता. सोमवारी स्वतंत्र तेलंगणच्या मुख्यंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. सोमवारी सकाळी केंद्र सरकारने तेलंगणमधील राष्ट्रपती राजवट मागे घेतली. यानंतर ई.एस.एल नरसिंहन यांनी तेंलगणच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. त्यापाठोपाठ चंद्रशेखर राव यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राव यांच्यासह ११ मंत्र्यांनी शपथ घेतली.
दरम्यान, स्वतंत्र तेलंगण राज्य अस्तित्वात येणार या आनंद सोहळ्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून हैदराबाद व तेलंगणमधील अन्य शहरांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. संपूर्ण हैदराबाद शहर गुलाबी रंगात न्हाऊन निघाले होते. स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी चंद्रशेखर राव यांच्यावर स्तुतिसुमने उधळणारी पोस्टर्स सर्वत्र लावण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चंद्रशेखर राव यांचे अभिनंदन करत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, सीमांध्रमध्ये तेलगू देसम पक्षाने १७५ जागांपैकी १०६ जागांवर विजय मिळवला होता़ तेदेपचे प्रमुख एऩ चंद्राबाबू नायडू ८ जूनला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे़