BJP MLA T Raja Singh:तेलंगणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आमदार राजा सिंह यांनी सोशल मीडिया पोस्टवर ही माहिती दिली आहे. राजा सिंह हे तेलंगणाचे एक फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. तेलंगणाच्या भाजप अध्यक्षपदी नव्या व्यक्तीच्या निवडीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आमदार टी. राजा सिंह यांनी पक्षाध्यक्षपदासाठी दावा केला होता. मला माहित आहे की ते मला हे पद देणार नाहीत, पण प्रयत्न करण्यात काय हरकत आहे? असं त्यांनी म्हटलं होतं.
तेलंगणाचे फायरब्रँड नेते आणि गोशामहलचे आमदार टी राजा सिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. प्रदेश भाजप अध्यक्षपदासाठी एन रामचंद्र राव यांच्या नावावर हायकमांडने सहमती दर्शवली. यामुळे संतप्त झालेल्या टी राजा सिंह यांनी आपला राजीनामा विद्यमान प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांना पाठवला आहे. राजा सिंह हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. मात्र प्रदेशाध्यक्षपदी निवड न झाल्याने नाराजी व्यक्त करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर टी राजा सिंह यांनी एक्सवर दोन पत्रे शेअर केली आहेत. याच्यासोबत कॅप्शनमध्ये, "लोकांचा शांत असण्याचा अर्थ संमती म्हणून घेऊ नये. मी फक्त माझ्यासाठी नाही तर असंख्य कार्यकर्त्यांसाठी आणि मतदारांसाठी बोलत आहे जे विश्वासाने माझ्यासोबत उभे राहिले आणि आज निराश आहेत," असं म्हटलं.
"मी पक्षापासून वेगळा होत असलो तरी, मी हिंदुत्वाच्या विचारसरणीशी आणि आमच्या धर्माची आणि गोशामहलच्या लोकांची सेवा करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी माझा आवाज उठवत राहीन आणि हिंदू समुदायासोबत आणखी मजबूतपणे उभा राहीन. हा एक कठीण निर्णय आहे, पण आवश्यक आहे. अनेकांच्या मौनाला संमती म्हणून घेऊ नये. मी फक्त माझ्यासाठी नाही तर आमच्यासोबत विश्वासाने उभे राहिलेल्या आणि आज निराश झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी आणि मतदारांसाठी बोलतो," असं टी राजा सिंह यांनी म्हटलं.
"मी आमच्या वरिष्ठ नेतृत्वाला - माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह आणि बीएल संतोष जी यांनाही नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा. तेलंगणा भाजपसाठी तयार आहे, पण आपण त्या संधीचा सन्मान करण्यासाठी योग्य नेतृत्व निवडले पाहिजे आणि ती संधी हातून जाऊ देऊ नये," असेही राजा सिंह म्हणाले.