...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 17:11 IST2025-05-25T15:56:43+5:302025-05-25T17:11:45+5:30
Tej Pratap Yadav News: बिहारमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी त्यांचे ज्येष्ठ पुत्रा तेजप्रताप यादव यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांनी पक्षामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.

...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
बिहारमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी त्यांचे ज्येष्ठ पुत्रा तेजप्रताप यादव यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांनी पक्षामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. तेजप्रताप यादव यांची वर्तणूक वैयक्तिक जीवनामध्ये नैतिक मूल्यांची अवहेलना करणारी असल्याचे सांगत लालूप्रसाद यादव यांनी यापुढे पक्ष आणि कुटुंबामध्ये त्यांना कुठलेही स्थान असणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
आपल्या वर्तणुकीमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या तेजप्रताप यादव यांनी काल सोशल मीडियावर एका तरुणीसोबतचे फोटो शेअर करून तिच्यासोबतच्या नात्याबाबत माहिती दिली होती. मात्र नंतर ही पोस्ट डिलिट करताना आपलं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला होता. त्यावरून चर्चांना उधाण आले होते. तसेच यावरून तेजप्रताप यादव आणि आरजेडीवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर आज लालू प्रसाद यादव यांनी ही कारवाई केली आहे.
तेजप्रताप यादव यांच्या हकालपट्टीची घोषणा करताना सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लालूप्रसाद यादव म्हणाले की, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांचा अवमान करणे आमच्या सामाजिक न्याय आणि सामूहिक संघर्षाला कमकुवत करते. माझ्या ज्येष्ठ पुत्राची वागणूक, लोकाचरण आणि बेजबाबदार वर्तन हे आमच्या कौटुंबिक मूल्य आणि संस्कार यांना शोभणारं नाही आहे. त्यामुळे वर्तमान परिस्थितीमुळे मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर करत आहे. आता पक्ष आणि कुटुंबामध्ये त्याचं कुठलंही स्थान असणार नाही. तेजप्रताप यादव याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे.
RJD chief Lalu Prasad Yadav expels his elder son, Tej Pratap Yadav from the party for 6 years, he also removed him from the family.
— ANI (@ANI) May 25, 2025
RJD chief Lalu Prasad Yadav posts on 'X': "Ignoring moral values in personal life weakens our collective struggle for social justice. The… pic.twitter.com/ZXAcH47hac
लालूप्रसाद यादव यांनी पुढे लिहिले की, आपल्या वैयक्तिक जीवनातील बरं-वाईट, गुणदोष पाहण्यासाठी तो स्वत: सक्षम आहे. आता जे लोक त्याच्यासोबत संबंध ठेवतील. त्यांनी स्वत:च्या बुद्धीने तसा निर्णय घ्यावा. मी सार्वजनिक जीवनामध्ये मर्यांदाचा नेहमी पुरस्कार केला आहे. माझ्या कुटुंबातील आज्ञाधारी व्यक्तींनी सार्वजनिक जीवनात याच विचाराचं आचरण केलं आहे, असेही लालूप्रसाद यादव यांनी सांगितले.