शौचालयासाठी ‘ती’ने दिला जीव

By Admin | Updated: July 5, 2015 04:29 IST2015-07-05T04:29:08+5:302015-07-05T04:29:08+5:30

घरात शौचालय बांधण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने नाराज झालेल्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना झारखंडच्या दुमका येथे घडली.

'Tee' given to the toilet | शौचालयासाठी ‘ती’ने दिला जीव

शौचालयासाठी ‘ती’ने दिला जीव

दुमका (झारखंड) : घरात शौचालय बांधण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने नाराज झालेल्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना झारखंडच्या दुमका येथे घडली.
दुमका येथील शास्त्रीनगरात राहणारी १७ वर्षीय खुबुकुमारी बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. घरी शौचालय नसल्याने तिला अर्धा कि.मी. लांब जावे लागत होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तिने आपल्या आई-वडिलांकडे घरात शौचालय बांधण्याचा आग्रह धरला होता; परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने तिने शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केली. मृत तरुणीचे वडील ट्रकचालक आहेत. आपल्या लग्नापूर्वी घरात शौचालय असावे अशी तिची इच्छा होती. पैसे नसल्याने आम्ही शौचालय बांधू शकलो नाही आणि याच कारणाने तिचे लग्नही करता येत नव्हते, अशी खंत खुबूची आई संजूदेवी यांनी पोलिसांसमक्ष व्यक्त केली. शौचालयासाठी मृत तरुणी आणि तिच्या आईदरम्यान वारंवार खटके उडत होते.
ही घटना डोळ्यात अंजन घालणारी आहे. कारण स्वच्छता आणि महिलांसाठी शौचालये हा गंभीर प्रश्न असल्याचे मत पोलीस उपमहानिरीक्षक डी.बी. शर्मा यांनी व्यक्त केले. दुमकाचे उपायुक्त राहुलकुमार सिन्हा यांनी सुद्धा शनिवारी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. या घटनेची गांभीर्याने दखल घेत दोषींविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
सोबतच दुमका आणि आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये किती घरांत शौचालये नाहीत याचा अहवाल तयार करून निर्मल ग्राम योजनेअंतर्गत पुढील एक-दोन महिन्यात प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचे निर्देशही सिन्हा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Tee' given to the toilet