दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 09:29 IST2025-11-08T09:28:35+5:302025-11-08T09:29:44+5:30
दरम्यान, शुक्रवारी सकाळी ATC अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टममध्ये आलेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 800 हून अधिक उड्डाणांना फटका बसला होता. यामुळे शेकडो प्रवासी काही तास टर्मिनलवरच अडकून पडले होते.

दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGIA) एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) प्रणालीतील तांत्रिक बिघाड आता पूर्णपणे दूर झाला आहे. AMSS (Automatic Message Switching System) आता सुरळीतपणे कार्यरत झआली असून विमान उड्डाण सेवा पुन्हा पटरीवर आली आहे. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी ज्या विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला होता, ती सर्व उड्डाणे आता त्यांच्या नियोजित वेळेनुसार सुरू आहेत, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी ATC अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टममध्ये आलेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 800 हून अधिक उड्डाणांना फटका बसला होता. यामुळे शेकडो प्रवासी काही तास टर्मिनलवरच अडकून पडले होते. AMSS मध्ये आलेल्या या समस्येमुळे फ्लाइट प्लॅन मेसेजेसच्या प्रक्रिया प्रणालीवर परिणाम झाला होता. परिणामी विमानतळावरील उड्डाण व्यवस्थापन विस्कळीत झाले होते.
आता दिल्ली विमानतळाने आधिकृतपणे सांगितले की, एअर ट्रॅफिक कंट्रोलची फ्लाइट प्लॅनिंग प्रक्रियेला सपोर्ट करणारे Automatic Message Switching System अर्थात AMSS आता पूर्णपणे व्यवस्थित आहे. विमानतळाने म्हटले आहे की, सर्व विमान सेवा पुन्हा सामान्य झाल्या आहेत. यामुळे आता प्रवाशांना कोणत्याही अतिरिक्त विलंब होणे अपेक्षित नाही.
एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (AAI) म्हटले आहे की, 6 नोव्हेंबर रोजी AMSS (Automatic Message Switching System) मध्ये आलेली तांत्रिक समस्या आता पूर्णपणे दूर करण्यात आली आहे. या समस्येचे कारण शोधून OEM तज्ज्ञ, ECIL टीम आणि AAIच्या कर्मचाऱ्यांनी प्रणाली पुन्हा कार्यान्वित केली आहे. याशिवाय, बॅकलॉगही पूर्णपणे क्लीयर करण्यात आला आहे आणि सध्या सर्व उड्डाणे नेहमीप्रमाणे आणि सुरळीतपणे सुरू आहेत.