तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 18:25 IST2025-09-24T18:25:27+5:302025-09-24T18:25:53+5:30
सध्या न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीमध्ये एक अजब घटना घडली आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या नेत्यांचे माईक अचानक बंद होण्याचा प्रकार वारंवार घडला.

तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद
सध्या न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीमध्ये एक अजब घटना घडली आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या नेत्यांचे माईक अचानक बंद होण्याचा प्रकार वारंवार घडला. एक दोन वेळा नाही तर चार नेत्यांच्या भाषणादरम्यान हा प्रकार घडला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगितले आहे. मात्र पॅलेस्टाइनच्या उल्लेखादरम्यानच हा प्रकार घडल्यामुळे मोसादचं नाव चर्चेत आलं आहे.
सुरुवातीला इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी गझामध्ये शांती सैना तैनात करण्याचा विषय काढल्यावर त्यांचा माईक बंद झाला. त्यानंतर तुर्कीएचे राष्ट्रपती रेचेप तैयप एर्दोगन यांच्यासोबत असाच प्रकार घडला. जेव्हा त्यांनी हमासला दहशतवादी संघटना न मानण्याचा आणि पॅलेस्टाइनला पाठिंबा देण्याचा विषय काढला तेव्हा अचानक त्यांचा आवाज बंद झाला.
एवढंच नाही तर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी जेव्हा पॅलेस्टाइन आणि दोन देशांमधील तोडग्याबाबत बोलले तेव्हा सुरवातीला त्यांचं भाषण सामान्य होते. मात्र पॅलेस्टाइनला मान्यत देण्याचा विषय काढताच त्यांचा माईक बंद झाला. तसेच काही मिनिटांत हॉलमध्ये शांतता पसरली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांच्यासोबत असाच प्रकार घडला. त्यांनी पॅलेस्टाइनचा मुद्दा उपस्थित करताच माईक बंद झाला.
आता संयुक्त राष्ट्रांनी तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे. मात्र एकच प्रकार वारंवार घडल्याने हा खरोखरच तांत्रिक बिघाड होता की त्यामागे अन्य कुणाचा हात होता असा प्रश्न उपस्थित होत आहे.