टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 09:01 IST2025-05-24T09:01:17+5:302025-05-24T09:01:28+5:30
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरसह त्याच्या दोन मुली आणि पत्नीचा मृतदेह सापडल्याने उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे.

टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
झारखंडमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एका घरात चार जणांचे मृतदेह फासाला लटकलेले आढळले आहेत. टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरसह त्याच्या दोन मुली आणि पत्नीचा मृतदेह सापडल्याने उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे.
सरायकेला-खरसावा जिल्ह्यातील आदित्यपूर पोलीस ठाणे हद्दीतील चित्रगुप्त नगरमध्ये ही घटना घडली आहे. कृष्ण कुमार (40 वर्षे) यांना कॅन्सर झाला होता. यामुळे कंटाळून त्यांनी कुटुंबाला संपवून नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कृष्ण कुमार यांच्या खोलीतून एक चिठ्ठी देखील सापडली आहे. या चिठ्ठीत रक्ताचा कर्करोग, कौटुंबिक कलह आणि माझ्यानंतर कुटुंबाचे काय होईल अशा गोष्टींचा उल्लेख आहे. यावरून कृष्णकुमार यांनी आधी पत्नी आणि मुलींना संपविले नंतर स्वत:चे आयुष्य संपवून घेतल्याचे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सराईकेलाचे एसपी मुकेश कुमार लुनावत यांनी सांगितले की, खोलीत जी चिठ्ठी सापडली आहे, त्यावरून तपास केला जात आहे. कृष्ण कुमार रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त होते. डॉलीच्या सल्ल्यानुसार कृष्णकुमार यांचे वडिलांनी कर्करोगाच्या उपचारासाठी मुलाला विमानाने मुंबईला नेले होते. डॉक्टरांनी त्यांना केमोथेरपी करण्याचा सल्ला दिला होता. ही सुविधा जमशेदपूरमध्येही होती. तिथे कृष्णकुमारला अॅडमिट करायचे होते, परंतू त्यापूर्वीच त्याने आयुष्य संपविल्याचे, वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे.