भाजपासाठी आता लक्ष्य महाराष्ट्र विधानसभा - अमित शाह

By Admin | Updated: August 9, 2014 13:19 IST2014-08-09T11:59:35+5:302014-08-09T13:19:52+5:30

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला निर्णायक मुसंडी मारून देणारे पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित शाह यांनी आता भाजपाचं पुढचं लक्ष्य महाराष्ट्र असल्याचं सांगताना राज्यात विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सूचित केले.

Target Maharashtra Assembly for the BJP - Amit Shah | भाजपासाठी आता लक्ष्य महाराष्ट्र विधानसभा - अमित शाह

भाजपासाठी आता लक्ष्य महाराष्ट्र विधानसभा - अमित शाह

>
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला निर्णायक मुसंडी मारून देणारे पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित शाह यांनी आता भाजपाचं पुढचं लक्ष्य महाराष्ट्र असल्याचं सांगताना राज्यात विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सूचित केले. शाह यांनी आज अधिकृतपणे राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे घेतली आणि आपण अध्यक्ष होणं हा सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान असल्याचं त्यांनी सांगितले.
बिहारमधल्या राजकारणाचा उल्लेख करत नितिश कुमार व लालूप्रसाद यादव यांच्यावर त्यांनी घणाघाती टीका केली. सत्तेसाठी हे नेते कुठल्याही थराला जात असल्याचा आरोप करत ज्या नितिशकुमारांनी लालूप्रसाद यादवांना टोकाचा विरोध केला तेच नितिशकुमार आज सत्तेसाठी लालूंना मांडीवर बसवत असल्याचे शाह म्हणाले. आत्तापर्यंत काँग्रेसच्या विरोधात सगळे एकत्र यायचे आता भाजपाविरोधात सगळे एकत्र येतात असे सांगत हा बदल चांगला असला तरी आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, राजनाथ सिंह, अरूण जेटली यांच्यासह पक्षाचे दोन हजार नेते उपस्थित होते.
नरेंद्र मोदी- राजनाथ सिंह यांच्या जोडीमुळे, त्यांच्या अथक परिश्रमांमुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले, अशा शब्दांत त्यांचे कौतुक करतानाच मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची उन्नतीच होईल, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला. देशातील अनेक राज्यांत अद्याप काँग्रेसची सत्ता असल्याचे सांगत आगामी निवडणुकीत आपण ही राज्ये काँग्रेसमुक्त करूया असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच अद्याप अनेक भागात भाजपाचे मजबुतीकरण करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 
दरम्यान शाह यांच्या भाषणापूर्वी पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे भाषण झाले. 'लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशात जे अभूतपूर्व यश मिळाले, त्यात अमित शाह यांचा मोलाचा वाटा आहे', अशा शब्दांत त्यांनी शाह यांचे कौतुक केले. त्यांना पक्षाध्यक्ष करण्याचा निर्णय अतिशय योग्य असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही सिंह यावेळी म्हणाले.

Web Title: Target Maharashtra Assembly for the BJP - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.