Tamil Nadu Accident:तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा हे एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. एका जाहीर सभेला संबोधित करत असताना अचानक एक मोठा लोखंडी खांब स्टेजवर कोसळला. ए. राजा हे भाषण करत असतानाच अचानक एलईडी लावलेला खांब कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र ए. राजा हे वेळीच बाजूला झाल्याने थोडक्यात त्यांचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तामिळनाडूच्या मयिलादुथुराई येथे हा सगळा प्रकार घडला. द्रमुकचे खासदार ए. राजा हे एका कार्यक्रमात स्टेजवर उभे राहून भाषण देत होते. मात्र जोरदार वाऱ्यामुळे व्यासपीठावर एक मोठा लोखंडी खांब पडला. पण याआधीच ए. राजा बाजूला झाले आणि त्यांनी आपला जीव वाचवला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
ए राजा जनतेला संबोधित करत असताना ही घटना घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये, ए राजा जिथे उभा होते तिथून काही इंच अंतरावर एलईडीचा खांब थेट माइक स्टँडवर पडताना दिसत आहे. मात्र ए राजा यांनी चपळाईने त्यांचा जीव वाचवला. ते लगेच मागे हटले आणि स्टेजवरून खाली पळाले.
लोखंडी खांब पडताच कार्यक्रमात उपस्थित असलेले लोकही घाबरले. स्टेजवर आणि आजूबाजूला एकच गर्दी झाली. द्रमुक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी घाईघाईने ए राजा यांना घेरले आणि त्यांना बाजूला काढले. दरम्यान, पावसाचाही जोर वाढायला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यामुळे बॅनर उडून गेले, खुर्च्या विखुरल्या गेल्या आणि कार्यक्रमस्थळावरुन लोकांनी काढता पाय घेतला.