तामिळनाडूत पुन्हा ‘अम्माराज’
By Admin | Updated: May 24, 2015 00:02 IST2015-05-24T00:02:27+5:302015-05-24T00:02:27+5:30
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आठ महिन्यांपूर्वी सत्तात्याग करावा लागणाऱ्या अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता शनिवारी पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्या.

तामिळनाडूत पुन्हा ‘अम्माराज’
जयललिता यांचा शपथविधी : पाचव्यांदा झाल्या मुख्यमंत्री
चेन्नई : भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आठ महिन्यांपूर्वी सत्तात्याग करावा लागणाऱ्या अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता शनिवारी पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्या. मद्रास विद्यापीठाच्या शताब्दी सभागृहात आयोजित एका समारंभात त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरातील समर्थक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.
कर्नाटक उच्च न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी निर्दोष ठरविल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी त्यांनी राज्याची सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली. राज्यपाल के. रोसय्या यांनी ६७ वर्षीय जयललिता यांच्याशिवाय त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर २८ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्या अनुपस्थितीत राज्याची धुरा सांभाळणारे माजी मुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्व्हम यांना मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. जयललिता यांची शुक्रवारी अण्णाद्रमुक पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर पन्नीरसेल्व्हम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. जयललिता यांनी यापूर्वीचेच जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळ कायम ठेवले आहे.
तामिळनाडूत पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि जयललिता यांच्या परतण्याने अण्णाद्रमुकला बळ प्राप्त झाले आहे. अण्णाद्रमुक सुप्रीमोने तामीळमध्ये ईश्वराच्या नावे शपथ घेतली त्यावेळी संपूर्ण सभागृहात ‘पुरात्वी थलैवी वषगा’ (क्रांतिकारी नेता जिंदाबाद)चे नारे लावण्यात आले. शपथविधी समारंभाला सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता सरतकुमार, केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन आणि अण्णाद्रमुक नेते व लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुरई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला बेंगळुरुमधील एका कनिष्ठ न्यायालयाने ६६.६६ कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी जयललिता यांना दोषी ठरविले होते. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना गेल्या ११ मे रोजी या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते. (वृत्तसंस्था)
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात जयललिता शपथविधीसाठी त्यांच्या पोएस गार्डन निवासस्थानाहून ७ किमी अंतरावरील मद्रास विद्यापीठाच्या शताब्दी सभागृहात पोहोचल्या तेव्हा मार्गाच्या दुतर्फा त्यांना बघण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. मार्गावर दोन्ही बाजूला स्टेनगनधारी कमांडो तैनात होते. समारंभ स्थळीही उत्सवाचे वातावरण होते.
निर्णयाचे अध्ययन-मुख्यमंत्री
नवी दिल्ली: अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांना आरोपमुक्त करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राज्याचा कायदे विभाग अध्ययन करीत असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सरकार याप्रकरणी याचिका करण्याचा निर्णय घेईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यासंदर्भात आपण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीसोबत चर्चा केली काय असे विचारले असता पक्षश्रेष्ठी राज्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करीत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
शपथविधी समारंभात जयललिता यांनी परिधान केलेल्या साडीपासून तर शपथविधीनंतर स्वाक्षरीसाठी वापरलेल्या पेनपर्यंत सर्वत्र हिरव्या रंगाचा बोलबाला होता. काही पक्ष कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार हिरवा रंग जयललिता यांना लाभी आहे व तो त्यांच्या आवडीचाही रंग आहे. सभागृहाच्या सजावटीतही हिरव्या रंगाचा वापर केला होता. जयललिता यांनी राज्यपाल रोसय्या यांना दिलेल्या पुष्पगुच्छाचे आवरण हिरव्या रंगाचेच होते. एवढेच नाहीतर त्यांनी बोटातही हिरव्या रंगाची रत्नजडित अंगठी घातली होती. त्यांच्या खास मैत्रीण शशिकला यांनी हिरव्या रंगाचाच पोशाख परिधान केला होता. महिला कार्यकर्त्याही हिरवी साडी नेसून होत्या.