चंडीगड : माझे उपोषण थांबवण्यासाठी अकाल तख्तकडे हस्तक्षेप करण्याची मागणी करण्याऐवजी भाजपने पंतप्रधाननरेंद्र मोदींची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी सत्ताधारी पक्षाला दिला आहे. डल्लेवाल यांचे उपोषण संपवण्यासाठी अकाल तख्तने हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे डल्लेवाल यांनी भाजप व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.
डल्लेवालांच्या उपोषणाला शुक्रवारी ४६ दिवस पूर्ण झाले आहेत. भाजपच्या नेत्यांनी अकाल तख्तला विनंती करण्याऐवजी पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती धनखड, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी, असा सल्ला डल्लेवाल यांनी सत्ताधारी पक्षाला दिला.
मागण्या मान्य झाल्या, तरच उपोषण सोडणार!
जोपर्यंत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा दृढनिश्चय शेतकरी नेते डल्लेवाल यांनी केला आहे. उपोषणादरम्यान उपचार घेण्यास नकार दिल्याने डल्लेवालांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. केंद्राचा मसुदा पंजाब सरकारने फेटाळला. कृषी विपणनाबाबतचा केंद्र सरकारचा मसुदा पंजाब सरकारने फेटाळला आहे. शेतकऱ्यांनी एक वर्षापेक्षा जास्त काळ आंदोलन केल्यामुळे २०२१ मध्ये रद्द झालेले तीन वादग्रस्त कृषी कायदे परत आणण्याचा डाव केंद्र सरकारने आखला असून हा मसुदा त्याचाच एक भाग असल्याचा दावा पंजाब सरकारने केला आहे.