लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दहशतवादी व तस्करीच्या कारवायांमध्ये सामील असलेल्या फरार गुन्हेगारांना भारतात परत आणण्यासाठी संबंधित तपास यंत्रणांनी विशेष उपाययोजना कराव्यात, असे आदेश त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत.
केंद्र व राज्यांच्या तपास यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे, असे शाह यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षा धोरण’ या विषयावर दिल्लीमध्ये आयोजिलेल्या परिषदेचे उद्घाटन करताना शुक्रवारी सांगितले. ते म्हणाले की, देशात दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आतापर्यंत ज्या पद्धतीने कारवाई करण्यात येत होती, त्यात बदल करण्याची गरज आहे. आर्थिक गैरव्यवहार व दहशतवादी गट यांचे लागेबांधे उघडकीस आणण्याच्या दिशेने तपास करणे महत्त्वाचे झाले आहे. दहशतवाद्यांना कोणत्या पद्धतीने आर्थिक रसद पुरविण्यात येते, त्या व्यवहारांशी कोणते दहशतवादी गट संबंधित आहेत, यावर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. या सर्व कामांसाठी पोलिसांनी स्वदेशी तंत्रज्ञानाचाच वापर प्राधान्याने करावा, अशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या.
भारताच्या विरोधातील विदेशातील गट, त्यांच्याशी संबंधित असलेले भारतातील घटक, अमली पदार्थांची तस्करी या विषयांवर राष्ट्रीय सुरक्षा धोरणविषयक परिषदेच्या पहिल्या दिवशी चर्चा झाली.
विविध राज्यांतील ८०० अधिकाऱ्यांची उपस्थिती
दहशतवादी गटांकडून एन्क्रिप्टेड कम्युनिकेशनचा वापर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या विषयावरही या परिषदेत चर्चा झाली. ही परिषद हायब्रिड पद्धतीने, म्हणजे प्रत्यक्ष उपस्थिती आणि आभासी माध्यमांद्वारे आयोजित करण्यात आली होती. विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक, तसेच अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असे सुमारे ८०० जण या परिषदेत सहभागी झाले होते.