ताजमहालचे दर्शन महागले! तिकीट दरात पाचपट वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 09:12 IST2018-12-11T08:49:31+5:302018-12-11T09:12:19+5:30
ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. सोमवारपासून (10 डिसेंबर) प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 50 रुपयांऐवजी 250 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.

ताजमहालचे दर्शन महागले! तिकीट दरात पाचपट वाढ
आग्रा - कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. सोमवारपासून (10 डिसेंबर) प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 50 रुपयांऐवजी 250 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. तसेच नव्या तिकीट दरांनुसार परदेशी पर्यटकांसाठी 1300 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. याशिवाय सार्क देशांमधून आलेल्या पर्यटकांना 540 रुपयांऐवजी 740 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.
आग्रा येथील 'ताजमहाल' जगातील सात आश्चर्यांपैकी एक असल्याने पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येत असतात. 200 रुपयांचे शुल्क मुख्य कबरीच्या दर्शनासाठी आकारण्यात येणार आहे. 50 रुपयांचे तिकीट खरेदी करणाऱ्या पर्यटकाला मुख्य कबरीच्या ठिकाणी प्रवेश करता येणार नाही; पण ताजमहालाच्या आसपासचा परिसर आणि यमुना नदीकाठचा परिसर पाहता येणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे गर्दी आटोक्यात आणून ताजमहालच्या मुख्य ढाच्यावरील भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.