मुसळधार पावसात ताजमहालाला गळती; व्हिडीओ व्हायरल; वास्तूचे नुकसान न झाल्याचा ‘एएसआय’चा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 05:30 IST2024-09-15T05:30:37+5:302024-09-15T05:30:57+5:30
ताजमहालच्या मुख्य घुमटातील गळतीबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाली.

मुसळधार पावसात ताजमहालाला गळती; व्हिडीओ व्हायरल; वास्तूचे नुकसान न झाल्याचा ‘एएसआय’चा दावा
आग्रा : गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताजमहालाच्या मुख्य घुमटातून पाण्याची गळती होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे; तसेच या वास्तूच्या आवारातील बागेतही पावसाचे पाणी साचले होते. या घुमटातून गळती होत असली तरी त्यामुळे त्या वास्तूचे नुकसान झालेले नाही, असा दावा आर्किऑलाॅजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय)च्या अधिकाऱ्याने केला.
ताजमहालच्या मुख्य घुमटातील गळतीबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाली. एएसआयचे आग्रा विभागाचे अधीक्षक राजकुमार पटेल यांनी सांगितले की, संततधारेमुळे ताजमहालाच्या मुख्य घुमटातून पाण्याची गळती होत असली तरी त्या वास्तूचे नुकसान झालेले नाही.
ताजमहाल दाखविण्यासाठी गाइड नेमण्यात आले आहेत. त्यांपैकी एकाने सांगितले की, या वास्तूमुळे हजारो स्थानिकांना रोजगार मिळतो. त्यामुळे ताजमहालची नीट देखभाल करणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)