स्वाइन फ्लू डोक्यावर डॉक्टर सुटटीवर ( महत्त्वाच्या चौकटी )
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
दवाखान्यांची सुरक्षा व्यवस्थाही वा-यावर
स्वाइन फ्लू डोक्यावर डॉक्टर सुटटीवर ( महत्त्वाच्या चौकटी )
दवाखान्यांची सुरक्षा व्यवस्थाही वा-यावर महापालिकेच्या या रूग्णालयांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक दवाखान्यात सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, शनिवारी दुपारी 1 नंतर केलेल्या या दवाखानांच्या तसेच रूग्णालयांच्या पाहणीत कोणत्याही ठिकाणी सुरक्षा रक्षक आढळून आले नाहीत. एवढच काय तर महापालिकेच्या रूग्णालयांसाठी औषध वितरण करण्याची जबाबदारी असलेल्या गाडीखाना येथील मध्यर्ती औषध वितरण केंद्रातही कोणताही सुरक्षा रक्षक नव्हता. विशेष म्हणजे या केंद्राच्या बाहेरच सुरक्षा रक्षकाची केबीन आहे. मात्र, लोकमतच्या प्रतिनिधीने या ठिकाणी फोटो काढले. त्यानंतर आत मध्ये जाऊन गाडीवर फेरफटकाही मारला. मात्र, आत मध्ये कोणीच दिसून आले नाही. त्यामुळे दरवर्षी सुरक्षा रक्षकांच्या नावाखाली खर्च केले जाणारे कोटयावधी रूपये जातात कोठे असा सवाल उपस्थित होत आहे.========================सुटट्या रद्द करण्याचे नाटक कशासाठी पुण्यासह राज्यभरात स्वाइन फ्लूचे संकट अधिक गहिरे झाल्याने 1 मार्च रोजी पुण्यात आलेल्या राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी ही साथ आटोक्यात आणण्यासाठी राज्यभरातील डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचा-यांच्या सुटटया रद्द केल्या होत्या. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागानेही आपले दवाखाने तसेच रूग्णालयां मधील डॉक्टरांना कार्यालयीन आदेश काढून सुटटया रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच हे आदेश न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा दमही भरला. मागील आठवडयात हे आदेश सर्वांना देण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात शनिवारी दुपारी साडेबारानंतरच शहरातील सर्व रूग्णालयांना टाळे लागले. त्यामुळे आरोग्य विभागाने सुटटया रद्द करण्याचे नाटक कशासाठी केले असा सवालही उपस्थित केला जात आहे.=============================खासगी रूग्णालयांच्या भरताहेत तुंबड्या महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे उपचार मोफत आहेत. एखाद्या रूग्णास या आजाराची लक्षणे दिसल्यानंतर पालिकेकडून त्यास मोफत टँमीफ्लूचे उपचार सुरू केले जातात. गेल्या तीन वर्षापूर्वी या साथीचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेने राबविलेल्या उपाय योजनांमुळे ही साथ आटोक्यात आली होती. त्यामुळे नागरिकांकडून पालिकेच्या दवाखान्यांना प्राधान्य दिले जात आहे. मात्र, शनिवारी आणि रविवारी पालिकेची रूग्णालये बंद असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूची तपासणी आणि त्याच्या उपचारासाठी नागरिकांना खासगी हॉस्पीटलचा आधार घ्यावा लागत असून अनेक ठिकाणी नागरिकांची लूट होत असल्याच्याही तक्रारी दिवसें दिवस वाढत आहेत. ================================