Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 12:20 IST2024-05-18T12:06:34+5:302024-05-18T12:20:41+5:30
Swati Maliwal : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे.

Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज असून ते आता जारी करण्यात आलं आहे. महिला सुरक्षारक्षक स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर घेऊन येत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी स्वाती महिला सुरक्षारक्षकाचा हात झटकताना दिसत आहेत.
13 मे रोजीचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे, ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून पीसीआर कॉल करण्यात आला होता. स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता.
याआधी शुक्रवारी (17 मे) आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता जो 13 मेचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील आहे. विभव कुमार बाजूला उभा होता आणि सुरक्षा कर्मचारी स्वाती मालीवाल यांच्याशी बोलत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच दरम्यान स्वाती मालीवाल 'मी सर्वांना धडा शिकवेन' असं म्हणताना दिसत आहेत.
विभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. स्वाती मालीवाल यांनी 13 मे रोजी सुरक्षेचा भंग करून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात प्रवेश केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर स्वाती ड्रॉईंग रूममध्ये आल्या आणि त्यांनी गोंधळ घातला. विभव कुमार यांच्यावरील आरोप खोटे असून त्यांनी स्वाती मालीवाल यांना मारहाण केली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.