"पक्ष केजरीवालांची संपत्ती नव्हे, मी १२ वर्षे दिली आहेत", 'आप' सोडण्याच्या प्रश्नावर स्वाती मालीवाल यांचे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 14:18 IST2025-02-09T14:17:25+5:302025-02-09T14:18:20+5:30

दिल्लीत आपविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाबाबत स्वाती मालीवाल यांनी स्पष्ट केले

swati maliwal arvind kejriwal aap resign demand controversy delhi election | "पक्ष केजरीवालांची संपत्ती नव्हे, मी १२ वर्षे दिली आहेत", 'आप' सोडण्याच्या प्रश्नावर स्वाती मालीवाल यांचे उत्तर!

"पक्ष केजरीवालांची संपत्ती नव्हे, मी १२ वर्षे दिली आहेत", 'आप' सोडण्याच्या प्रश्नावर स्वाती मालीवाल यांचे उत्तर!

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पुन्हा एकदा स्वतःच्या पक्षाविरुद्ध मोर्चा उघडला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्रीपद सोडणाऱ्या आतिशी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावरही स्वाती मालीवाल यांनी निशाणा साधला आहे.

स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ शेअर करून आतिशी यांना फटकारले आहे. या व्हिडिओमध्ये, आतिशी आपल्या समर्थकांसोबत विजयाचा आनंद साजरा करताना नाचत असल्याचे दिसून येत आहे. यावरून स्वाती मालीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. "जेव्हा संपूर्ण पक्ष हरला, मोठे नेते निवडणुकीत हरले, मग आतिशी कशाचा आनंद साजरा करत आहेत?, असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीत आपविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाबाबत स्वाती मालीवाल यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, "मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही तर जनतेच्या संतापाचा आवाज उठवला. लोक खूप संतापले होते. दिल्लीची स्थिती बिकट झाली आहे, शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रूपांतरित झाले आहे. अरविंद केजरीवाल आणि आतिशी एसी रूममध्ये पत्रकार परिषदा घेतात, तर मी जमिनीवर काम करते."

आपच्या पराभवाने तुम्ही खूश आहात का? असे विचारले असता स्वाती मालीवाल भावूक झाल्या आणि म्हणाल्या,"मला खोटारडी म्हटले गेले, माझ्याविरुद्ध कट रचण्यात आला. एका महिलेवर हिंसाचार झाला आणि देवाने त्यांना त्याची शिक्षा दिली आहे." याचबरोबर, स्वाती मालीवाल यांनी आप पक्ष सोडण्याबाबत स्पष्ट नकार दर्शविला. त्या म्हणाल्या की,"मी आपला १२ वर्षे दिली आहेत. आप पक्ष म्हणजे केवळ अरविंद केजरीवाल यांची संपत्ती नाही." 

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, राखी बिर्लन आणि सोमनाथ भारती यांसारख्या आपच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी भाजप उमेदवार रमेश बिधुरी यांचा ३,५२१ मतांनी पराभव केला. 

दिल्लीत २७ वर्षानंतर भाजपची सत्ता
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० मतदारसंघात ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं आणि ८ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागला. यात जनतेने ४८ जागांवर भाजपला कौल दिला असून तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत भाजपची सत्ता आली आहे. तर, गेल्या निवडणुकीत ६२ जागा जिंकणाऱ्या आपला या निवडणुकीत फक्त २२ जागांवर समाधान मानावं लागलं.

Web Title: swati maliwal arvind kejriwal aap resign demand controversy delhi election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.