आज असाच एक श्रीमंतयोगी लाभलाय; मोदींबद्दल बोलताना स्वामी गोविंददेवगिरींना शिवरायांचं स्मरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 15:06 IST2024-01-22T14:56:11+5:302024-01-22T15:06:07+5:30
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आदर्श व्यक्ती लाभली, असे कौतुकोद्गार गोविंददेव गिरी महाराज यांनी काढले.

आज असाच एक श्रीमंतयोगी लाभलाय; मोदींबद्दल बोलताना स्वामी गोविंददेवगिरींना शिवरायांचं स्मरण
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: तप करणे ही भारताची परंपरा राहिली आहे. या ठिकाणी एका राजाची आठण होत आहे, जे सर्वगुण संपन्न होते. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. समर्थ रामदास स्वामी यांचीही यावेळी आठवण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गौरवोद्गार काढताना समर्थ रामदास स्वामी म्हणाले होते की, निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी. आपल्याला असाच एक श्रीमंत योगी प्राप्त झाला आहे, अशा भावना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केल्या. यावेळी गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते तीर्थ प्राशन करत पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवसांचा उपवास सोडला.
रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. एखादे परिवर्तन आणण्यासाठी एखाद्या महापुरुषाला स्वतःचे जीवन अर्पावे लागते. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक आदर्श व्यक्ती लाभली. राम मंदिरात केवळ एका मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली नाही, तर या देशाची अस्मिता, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाची पुन्हा प्रतिष्ठापना झाली आहे. ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हे स्वप्न पूर्ण होत आहे, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांनी तीन दिवसांऐवजी ११ दिवसांचा उपवास केला
२० दिवसांपूर्वी निरोप मिळाला की, पंतप्रधान मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीसाठी काय करावे लागेल, हे विचारत आहेत. त्यासाठी काय नियम आहेत, असे विचारले गेले. आपल्या देशात राजकीय पुढारी कधीही काहीही करतात. पण पंतप्रधान मोदींनी नियम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतातील सर्वोच्च आदर्श पुरुष प्रभूश्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी काय करावे लागले, हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी यांनी केवळ तीन दिवसांचा उपवास करावा, असे सांगितले होते. पण पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवसांचा उपवास केला. एखाद्या राष्ट्रीय नेत्यांनी एवढा त्याग करणे सोपी गोष्ट नाही. पंतप्रधान मोदी नाशिकच्या पंचवटीपासून प्रवास सुरू केला ते कन्याकुमारीच्या रामेश्वरपर्यंत ते गेले, असे सांगत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले
लोकांना कदाचित माहिती नसेल की, छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशेलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. मला राज्य करायचे नाही, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आले. पण ज्येष्ठ मंत्र्यांनी महाराजांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे, असे सांगितले, अशी एक आठवण स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी यावेळी सांगितली. तसेच पंतप्रधान मोदी यांच्याकडे हात दर्शवत, असाच एक श्रीमंत योगी आपल्याला प्राप्त झाला आहे, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले.