सर्वेक्षण : तरुण पिढी ई–सिगारेटच्या मगरमिठीत, प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 17:56 IST2019-06-24T17:55:40+5:302019-06-24T17:56:31+5:30
लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी तरुणांना मगरमिठीत घेणाऱ्या ई-सिगारेट विषयी प्रश्न संसदेत उपस्थित केला.

सर्वेक्षण : तरुण पिढी ई–सिगारेटच्या मगरमिठीत, प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम
मुंबई : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हेक्षणानुसार देशातील सुमारे ३ टक्के प्रौढांना ई– सिगारेट विषयी माहिती असून अंदाजे ०.०२ टक्के तरुणांना त्याचे व्यसन आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अन्वये ई–सिगारेट मुळे गर्भधारणा, प्रजनन क्षमता यावर विपरीत परिणाम होतात. श्वसनाचे विकार व त्याचप्रमाणे मुलांच्या मेंदू विकसन आणि आकलन क्षमतेवरही याचा परीणाम होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी तरुणांना मगरमिठीत घेणाऱ्या ई-सिगारेट विषयी प्रश्न संसदेत उपस्थित केला. खासदार कीर्तिकर यांनी संसदेत ई सिगारेट विषयी तरुणांमधील आकर्षण आणि त्याचे दुष्परिणाम, ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस कडून त्यावर केली जाणारी कारवाई आणि शासनाकडून घेतली जाणारी खबरदारी, तरुणांमधील ई–सिगारेट विषयी कमी पडणारी जनजागृकता आणि त्यावर शासनाकडून राबविले जाणारे जागरूकतेचे धोरण याविषयी प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान, याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जास्तीत जास्त जनजागृती केली जावी यासाठी संबंधित मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे खासदार कीर्तिकर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.