Supriya Sule on Tejasvi Surya: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ९७ दिवसांनंतर सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी ऑपरेशन सिंदूवर आपली मते मांडली. यावेळी पाकिस्तानने केलेल्या विनंतीनंतर ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. विरोधी नेत्यांकडे शिष्टमंडळाचे नेतृत्व सोपवणे ही पंतप्रधानांची उदारता असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. जगभरात जाऊन ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडणाऱ्या खासदारांच्या गटाचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांनी केले होते. यामध्ये भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचाही त्यात समावेश होता. दुसरीकडे चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांना चांगलेच फटकारले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सोमवारी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत सहभागी झाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले, तर भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्यावरही त्यांनी टीका केली. भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी राष्ट्रीय सुरक्षेवरुन मागील काँग्रेस सरकारांवर निशाणा साधला होता. त्यालाच सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच त्यांनी भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी त्या ठिकाणी नागरिकांचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा दलाचे कौतुक देखील केले.
"ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विरोधी नेत्यांना परदेशी शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्याची संधी देऊन उदारता दाखवली. भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी लोकसभेत चुकीची वक्तव्ये केली आहेत. ते म्हणाले होते की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधीही सैन्यदलाला प्रोत्साहित केले नाही किंवा त्यासाठी काहीच केले नाही. पहिल्या भारत-पाक युद्धात भारताला अपयश आलं होतं, असं ते म्हणाले. काँग्रेस सरकारच्या काळात सशस्त्र दलांना प्रोत्साहन दिले जात नाही असे सांगून तेजस्वी सूर्या यांनी लाखो सैनिकांचा अपमान केला," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"पाकिस्तानबरोबर आपण पहिल्या युद्धात कमी पडलो असं तेजस्वी सूर्या सांगत होते. त्यांचा इतिहास जरा कच्चा आहे. त्यांना इतिहास सांगते. कारण हे नवे लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात. कदाचित अंधभक्त वगैरे असतील. त्यांनी केलेल्या विधानावर माझा आक्षेप आहे. तेजस्वी सूर्या, जर तुम्ही इतिहास वाचला नसेल तर तो वाचा. जेव्हा देशाचा विचार केला जातो तेव्हा देश आधी येतो, नंतर राज्य, नंतर पक्ष, नंतर कुटुंब," असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.