सुप्रीम कोर्टाने फोडली दहीहंडीची 'कोंडी'

By Admin | Updated: August 14, 2014 13:06 IST2014-08-14T12:25:40+5:302014-08-14T13:06:55+5:30

सुप्रीम कोर्टाने दहीहंडीच्या उंचीसंदर्भातील निर्बंध शिथील करत १२ वर्षांवरील मुलांना गोविंदा पथकांमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली आहे.

Supreme court upheld Dahihandi's 'Kandi' | सुप्रीम कोर्टाने फोडली दहीहंडीची 'कोंडी'

सुप्रीम कोर्टाने फोडली दहीहंडीची 'कोंडी'

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १४ -  दहीहंडी उत्सवाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला गुरुवारी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दहीहंडीच्या उंचीसंदर्भातील निर्बंध शिथील करत १२ वर्षांवरील मुलांना गोविंदा पथकांमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. 
गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीमध्ये लाखो रुपयांच्या बक्षिसापायी थरांची जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली. यात गोविंदा पथकामधील तरुणांना जीव गमवावा लागला तर अनेक गोविंदांना कायमचे अपंगत्व आले. यावर दोन दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने लगाम लावला होता. मुंबई हायकोर्टाने दहीहंडीची उंची २० फूटांपेक्षा जास्त असू नये, तसेच १८ वर्षांखालील मुलांना थरांवर चढण्यास निर्बंध घातले होते. मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे दहीहंडी आयोजक आणि गोविंदा पथकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. महाराष्ट्राची ओळख असलेल्या दहीहंडीवर उंचीचे निर्बंध घातल्यास त्यातील मजा निघून जाईल असा युक्तीवाद समर्थकांनी केला. मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. 
गुरुवारी सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला एक वर्षासाठी स्थगिती दिली.कोर्टाने उंचीचे निर्बंध शिथील केले. तसेच महाराष्ट्रातील बाल हक्क कायद्यानुसार गोविंदा पथकांमध्ये १२ वर्षांवरील मुलांना सहभागी होण्यास परवानगी दिली. मात्र दहीहंडी आयोजक व गोविंदा पथकांना सुप्रीम कोर्टाने नियमावलीच दिली आहे. सुरक्षेसाठी हेल्मेट आणि सेफ्टी बेल्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच दहीहंडी उत्सवात आवाजाची ६५ डेसीबलची मर्यादा घालण्यात आली आहे. याशिवाय गादीसारख्या मऊ भागावर दहीहंडीचे आयोजन करावे असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर दहीहंडी गोविंदा पथक आणि दहीहंडी आयोजक आ. जितेंद्र आव्हाड यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Web Title: Supreme court upheld Dahihandi's 'Kandi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.